धडाकेबाज खेळासमोर बंगळूर हतबल; 3-1 फरकाने बाजी

Mumbai City FC have once again claimed the top spot in the seventh season of the Indian Super League ISL football tournament
Mumbai City FC have once again claimed the top spot in the seventh season of the Indian Super League ISL football tournament

पणजी : मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात पुन्हा एकदा अग्रस्थानावर हक्क सांगितला. वर्चस्व राखत मंगळवारी त्यांनी माजी विजेत्या बंगळूरला हतबल केले. विजयी संघास शेवटची चार मिनिटे असताना दहा खेळाडूंसह खेळावे लागले, पण आघाडी निसटली नाही.

सामना 3-1 फरकाने जिंकत मुंबईच्या संघाने 22 गुणांसह जवळचा प्रतिस्पर्धी एटीके मोहन बागानवर दोन गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी संपादली. बंगळूरला सलग तिसऱ्या पराभवाची नामुष्की पत्करावा लागली. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.

सेनेगलचा 33 वर्षीय बचावपटू मुर्तदा फॉल याने सेट पिसेसवरील शानदार हेडिंगवर नवव्या मिनिटास मुंबई सिटीचा पहिला गोल केल्यानंतर 15व्या मिनिटास 25 वर्षीय मध्यरक्षक बिपिन सिंगने मैदानी गोलवर मुंबईच्या संघाची आघाडी वाढविली. 36 वर्षीय कर्णधार सुनील छेत्रीने 79व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर बंगळूरची पिछाडी कमी केली. 84व्या मिनिटास बदली खेळाडू 36 वर्षीय नायजेरियन बार्थोलोमेव ओगबेचे याने सेटपिसेसवरील हेडिंगवर गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूच्या चुकीमुळे मुंबई सिटीच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला. सामन्यातील दुसरे यलो कार्ड मिळाल्यामुळे 86व्या मिनिटास मुंबई सिटीच्या अहमद जाहू याला रेड कार्डसह मैदान सोडावे लागले. त्याला पहिले यलो कार्ड 40व्या मिनिटास मिळाले होते.

सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटीचा हा नऊ लढतीतील सातवा विजय ठरला. स्पर्धेतील पहिल्याच लढतीत पराभूत झाल्यानंतर सात विजय व एका बरोबरीसह हा संघ आता आठ लढतीत अपराजित आहेत. कार्ल्स कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखालील बंगळूरला नऊ लढतीतील तिसऱ्या पराभवामुळे 12 गुणांसह पाचव्या क्रमांकावर कायम राहावे लागले.

सामन्याच्या सुरवातीच्या पंधरा मिनिटांत दोन गोल नोंदवून मुंबई सिटीने बंगळूरच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. सहा फूट दोन इंच उंचीच्या मुर्तदा याने आपल्या उंचीचा खुबीने वापर करत मुंबई सिटीचे गोल खाते खोलले. सेट पिसेसवर बिपिन सिंगच्या कॉर्नर किकवर मुर्तदाने बंगळूरच्या ज्युआननपेक्षा उंच उडी घेत शानदार हेडिंगने गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूचा बचाव भेदला. सहा मिनिटानंतर मंदार राव देसाई याने मैदानाच्या डाव्या बाजूतून दिलेल्या अप्रतिम क्रॉस पासवर बिपिन सिंगने अफलातून चापल्य प्रदर्शित करत गोलनेटच्या अगदी समोरून गोलरक्षकाला चकवा देत मुंबई सिटीपाशी दोन गोलची आघाडी जमा केली.

मुंबई सिटीच्या क्लेटन सिल्वा याला मुंबई सिटीच्या मुर्तदा फॉल याने पाडल्यानंतर रेफरीने पेनल्टी फटक्याची खूण केली. हा निर्णय मुंबई सिटीच्या खेळाडूंना पटला नाही, त्यामुळे थोडीफार तणाव झाला, पण सुनील छेत्रीने अचूक फटका मारताना अजिबात चूक केली नाही. सामना संपण्यास सहा मिनिटे असताना साय गोडार्डच्या कॉर्नर किकवर ओगबेचे याचा हेडर बंगळूरचा अनुभवी गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू व्यवस्थित अडवू शकला नाही. त्याच्या हातून चेंडू सुटून गोलरेषेच्या आत गेला.

दृष्टिक्षेपात...

  • - मुर्तदा फॉलचा यंदाच्या मोसमात 1 गोल, आयएसएलमधील 48 लढतीत 10 गोल
  • - मुंबई सिटीतर्फे पहिलाच गोल, फॉलचे अन्य 9 गोल एफसी गोवातर्फे
  • - बिपिन सिंगचे 42 आयएसएल लढतीत 5 गोल, यंदा पहिलाच
  • - सुनील छेत्रीचे मोसमात 4, तर आयएसएलमधील 83 सामन्यांत 43 गोल
  • - बार्थोलोमेव ओगबेचे याचे यंदा 3, तर 43 आयएसएल लढतीत 30 गोल
  • - मुंबई सिटीचे आयएसएलच्या सातव्या मोसमात सर्वाधिक 16 गोल
  • - अहमद जाहू याला मोसमात 2 वेळा रेड कार्ड 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com