मुंबई सिटी पुन्हा नंबर 1 ; केरळा ब्लास्टर्सचा केला पराभव

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 3 जानेवारी 2021

सामन्यात सुरवातीच्या अकरा मिनिटांत दोन गोल नोंदवत मुंबई सिटीने आघाडी संपादली, त्या बळावर अखेर केरळा ब्लास्टर्सला 2-0 फरकाने हरवून इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात सहावा विजय नोंदवत पुन्हा अव्वल स्थान प्राप्त केले.

पणजी :  सामन्यात सुरवातीच्या अकरा मिनिटांत दोन गोल नोंदवत मुंबई सिटीने आघाडी संपादली, त्या बळावर अखेर केरळा ब्लास्टर्सला 2-0 फरकाने हरवून इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात सहावा विजय नोंदवत पुन्हा अव्वल स्थान प्राप्त केले. सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर काल झाला. इंग्लिश खेळाडू अॅडम ली फाँड्रे याने तिसऱ्याच मिनिटास पेनल्टीवर मुंबई सिटीचे गोल खाते उघडले. त्यानंतर अकराव्या मिनिटास ह्युगो बुमूसच्या गोलमुळे सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने दोन गोलची आघाडी प्राप्त केली. सामन्याच्या 72व्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्स याने ह्यूगो बुमूसचा पेनल्टी फटका अडविला, त्यामुळे मुंबई सिटीच्या आघाडीत वाढ झाली नाही.

 

मुंबई सिटीचे आता आठ लढतीनंतर 19 गुण झाले आहेत. त्यांनी एटीके मोहन बागानला दोन गुणांनी मागे टाकले. केरळा ब्लास्टर्सला चौथा पराभव पत्करावा लागला. त्यांचे आता आठ लढतीनंतर सहा गुण व नववा क्रमांक कायम आहे. सामन्याच्या पहिल्या अकरा मिनिटांत दोन गोल नोंदवत मुंबई सिटीने सामन्याची सूत्रे हाती घेतली, नंतर सहल अब्दुल समद याची सदोष नेमबाजी आणि मुंबईच्या अमरिंदरचे दक्ष गोलरक्षण यामुळे केरळा ब्लास्टर्सला पिछाडी भरून काढता आली नाही. अमरिंदर सामन्याचा मानकरी ठरला. दोन गोल स्वीकारलेल्या किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने उत्तरार्धात चिवट प्रतिकार केला, पण त्यांचे प्रयत्न फलदायी ठरले नाहीत, त्यातच एक गोल ऑफसाईड ठरला.

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटास गोलक्षेत्रात केरळा ब्लास्टरच्या कॉस्ता न्हामोईनेसू याने मुंबईच्या ह्यूगो बुमूसला पाडण्याची चूक केली. त्यानंतर केरळाचा गोलरक्षक आल्बिनो गोम्स याने अॅडम ली फाँड्रे याच्या पेनल्टी फटक्याचा चांगला अंदाज बांधला, पण चेंडू त्याचा पायास आपटून नेटमध्ये गेला. त्यानंतर सेट पिसेसवर बुमूसने मुंबई सिटीची आघाडी वाढविली. अहमद जाहूच्या फ्रीकिकवर फ्रेंच नागरिक असलेल्या बुमूसने चेंडूसह केरळाच्या गोलक्षेत्रात धडक मारली आणि जोरदार फटक्यावर गोलरक्षक आल्बिनोस चकविले.

केरळा ब्लास्टर्सने दोन गोलच्या पिछाडीनंतरही प्रतिकार केला. कुलिंग ब्रेकपूर्वी सहल अब्दुल समद याने चेंडूवर ताबा मिळवत आक्रमक फटका मारला, पण गोलरक्षक अमरिंदरने डावीकडे झेपावत मुंबईची आघाडी अबाधित राखली. त्यानंतर लगेच समद याने आणखी एक मोठी चूक केली. फाकुंदो परेरा याला चेंडू पास करण्याऐवजी त्याने स्वतः फटका मारला, पण अमरिंदर दक्ष ठरल्याने केरळा संघास पिछाडी कमी करणे जमले नाही. विश्रांतीपूर्वी अॅडम ली फाँड्रे याचा फटका गोलपट्टीवरून गेल्याने मुंबई सिटीची आघाडी दोन गोलपुरती मर्यादित राहिली. विश्रांतीनंतरही केरळा ब्लास्टर्सला नशिबाची साथ लाभ नाही. उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर अकराव्या मिनिटास जॉर्डन मरे याचा गोल ऑफसाईड ठरल्यामुळे मुंबई सिटीचे नुकसान झाले नाही.

 

दृष्टिक्षेपात...

- मुंबई सिटीच्या अॅडम ली फाँड्रे याचे मोसमात 6 गोल, पेनल्टीवर 3

- मुंबई सिटीच्या ह्यूगो बुमूसचा मोसमातील पहिला गोल, तर 48 आयएसएल सामन्यात 17 गोल

- केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्सने मोसमात अडविलेले पेनल्टी फटके 3

- मुंबई सिटीचे सर्वाधिक 13 गोल, तर केरळा ब्लास्टर्सवर प्रतिस्पर्ध्यांचे 13 गोल

 

 

संबंधित बातम्या