'आयएसएल'मध्ये आज एफसी गोवा आणि केरळा ब्लास्टर्स आमनेसामने, दुसऱ्या सामन्यात ओडिशा एफसी देणार मुंबई सिटीला टक्कर

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 6 डिसेंबर 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात सध्या एफसी गोवा आणि केरळा ब्लास्टर्स संघ समदुःखी आहेत. तीन सामने खेळूनही ते विजयापासून दूर आहेत. आज फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एकमेकाविरुद्ध उभे ठाकताना सामना जिंकण्याचेच त्यांचे लक्ष्य राहील.

पणजी :  इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात सध्या एफसी गोवा आणि केरळा ब्लास्टर्स संघ समदुःखी आहेत. तीन सामने खेळूनही ते विजयापासून दूर आहेत. आज फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एकमेकाविरुद्ध उभे ठाकताना सामना जिंकण्याचेच त्यांचे लक्ष्य राहील.

आज आणखी एक सामना होणार असून बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर तळाच्या ओडिशा एफसीविरुद्ध मुंबई सिटीचे पारडे जड राहील. मुंबई सिटीने मागील लढतीत धडाकेबाज खेळताना ईस्ट बंगालचा तीन गोलांनी धुव्वा उडविला. अॅडम ली फाँड्रे, ह्युगो बुमूस, अहमद जाहू याच्या जोमदार खेळामुळे मुंबईची कामगिरी उंचावली. सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे तीन लढतीतून सहा गुण असून आघाडीच्या एटीके मोहन बागानला (९ गुण) गाठण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. स्टुअर्ट बॅक्स्टर यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशा संघाच्या खाती तीन लढतीनंतर फक्त एक गुण आहे. या संघाला विशेष सूर गवसलेला नाही. एटीके मोहन बागानविरुद्ध त्यांना इंज्युरी टाईम गोलमुळे पराभव पत्करावा लागला होता. ओडिशाविरुद्ध आपल्या संघास संभाव्य विजेते मानण्यास लोबेरा तयार नाहीत. ‘‘माझ्यासाठी कोणीही संभाव्य विजेता नाही. माझा संघ हेच माझे लक्ष्य आहे आणि मला त्यांच्यात प्रगती साधणे गरजेचे आहे. आम्ही दोन सामने जिंकले आहेत, पण अजूनही सुधारणेसाठी भरपूर वाव आहे,’’ असे लोबेरा सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाले.

आक्रमक शैलीस हवा विजय

ज्युआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाने तिन्ही लढतीत आक्रमक खेळ केला, पण मोसमातील पहिला विजय नोंदविणे त्यांना शक्य झालेले नाही. बंगळूर व नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धच्या बरोबरीमुळे त्यांच्या खाती फक्त दोन गुण आहेत. एफसी गोवास मुंबई सिटीकडून हार पत्करावी लागली. एटीके मोहन बागानविरुद्ध पहिल्या लढतीत हार पत्करल्यानंतर स्पॅनिश किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखालील केरळ ब्लास्टर्सने नॉर्थईस्ट युनायटेड व चेन्नईयीनला बरोबरीत रोखत तीन लढतीतून दोन गुणांची कमाई केली आहे. चेन्नईयीनविरुद्धच्या गोलशून्य लढतीत गोलरक्षक आल्बिनो गोम्स याने पेनल्टी फटका अडविल्यामुळे केरळा ब्लास्टर्सला पराभव टाळता आला. मागील लढतीत दुखापतग्रस्त झालेला केरळा ब्लास्टर्सचा प्रमुख खेळाडू सर्जिओ सिदोन्चा उद्या खेळण्याची शक्यता कमी आहे.‘‘काहीवेळा आम्ही चांगल्या चाली रचतो, पण जागा मिळवून संधी साधणे जास्त महत्त्वाचे असले,’’ असे फेरॅन्डो एफसी गोवाच्या कमजोरीविषयी म्हणाले. सर्व समस्यांचे निवारण करून भविष्यात मजबूत खेळण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
 

दृष्टिक्षेपात...

  •   एफसी गोवा आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यात आयएसएलमध्ये १२          लढती
  •   एफसी गोवाचे ८, तर केरळा ब्लास्टर्सचे ३ विजय, १ लढत बरोबरीत
  •   एकमेकांविरुद्ध, एफसी गोवाचे ३०, तर केरळा ब्लास्टर्सचे १५ गोल
  •   गतमोसमात कोची येथे २-२ बरोबरी, फातोर्डा येथे एफसी गोवा ३-२          फरकाने विजयी
  •   केरळा ब्लास्टर्सविरुद्ध सलग ६ सामने एफसी गोवा अपराजित
  •   मुंबई सिटीचा अॅडम ली फाँड्रे, एफसी गोवाचा इगोर आंगुलो यांचे         प्रत्येकी ३ गोल, ओडिशाच्या दिएगो मॉरिसियोचे २ गोल
  •   गतमोसमात ओडिशाचे मुंबई सिटीवर २ विजय
  •   मुंबईत ४-२, तर भुवनेश्वर येथे २-० फरकाने ओडिशा विजयी

 

 

संबंधित बातम्या