लोबेरांमुळे मुंबई सिटी संघात : बुमूस

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

गतमोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा संघातर्फे खेळताना यशस्वी ठरलेला फ्रेंच-मोरोक्कन मध्यरक्षक ह्यूगो बुमूस आगामी मोसमात मुंबई सिटी एफसीकडून खेळणार आहे. प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांच्यामुळेच आपण नव्या संघात दाखल झाल्याचे २५ वर्षीय खेळाडूने नमूद केले.  

पणजी: गतमोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा संघातर्फे खेळताना यशस्वी ठरलेला फ्रेंच-मोरोक्कन मध्यरक्षक ह्यूगो बुमूस आगामी मोसमात मुंबई सिटी एफसीकडून खेळणार आहे. प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांच्यामुळेच आपण नव्या संघात दाखल झाल्याचे २५ वर्षीय खेळाडूने नमूद केले.  

‘‘सर्जिओ लोबेरा यांच्यासमवेत काम करताना मी यशस्वी ठरलोय हे गुपित राहिलेले नाही. माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी कशी बजावून घेता येईल हे त्यांना पक्के ठावूक आहे. त्यांच्याशी पुन्हा जोडताना मला आनंद होत आहे,’’ असे बुमूसने मुंबई सिटीद्वारे त्याचा करार पक्का केल्यानंतर सांगितले. लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली बुमूस मोरोक्कोतील मोघ्रेब तेतौआन व भारतातील एफसी गोवा संघातून खेळला आहे. ‘‘ह्यूगो भारतात खेळणाऱ्या सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक आहे. त्याचे आकडे आणि मिळालेली शाबासकी बोलकी आहे. त्याच्या वयाचा विचार करता, अनुभव अफाट आहे. आम्ही त्याला मुंबई सिटीकडे आणू शकलो याचा जास्त आनंद वाटतो,’’ असे लोबेरा यांनी आपल्या मर्जीतील बुमूस याच्याविषयी नमूद केले.

लोबेरा तीन मोसम एफसी गोवाचे प्रशिक्षक होते, पण गतमोसमाच्या अखेरच्या टप्प्यात संघ व्यवस्थापनाशी बिनसल्यामुळे ते एफसी गोवाच्या प्रशिक्षकपदावरून दूर झाले. बुमूसचा गोव्यातील संघाशी दोन वर्षांचा करार शिल्लक होता. जुलैमध्ये समाज माध्यमांद्वारे बुमूसने आपण मुंबई सिटीत दाखल होत असल्याचे जाहीर केले होते, पण त्याला मुक्त करण्यास एफसी गोवाने नकार दिला होता. नव्या संघाची करार करण्यासाठी बुमूसने एफसी गोवाच्या करार नियमावलीतील अटींची पूर्तता करणे आवश्यक होते. यामध्य शुल्क भरपाई कळीचा मुद्दा होता. प्राप्त माहितीनुसार, बुमूससाठी मुंबई सिटीने मोठी रक्कम मोजली आहे.
 

संबंधित बातम्या