आत्मविश्वास उंचावलेल्या केरळा ब्लास्टर्सशी गाठ

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

अव्वल स्थान पुन्हा मिळविण्यासाठी सज्ज होताना त्यांची गाठ मागील लढतीतील विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या केरळा ब्लास्टर्सशी पडेल.

पणजी : मुंबई सिटी एफसी संघाला इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तब्बल बारा दिवसांची विश्रांती मिळाली. अव्वल स्थान पुन्हा मिळविण्यासाठी सज्ज होताना त्यांची गाठ मागील लढतीतील विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या केरळा ब्लास्टर्सशी पडेल.

मुंबई सिटी व केरळा ब्लास्टर्स यांच्यातील सामना शनिवारी (ता. 2) बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर खेळला जाईल. आयएसएलमधील नव्या वर्षातील हा पहिला सामना आहे.

मुंबई सिटीचे सध्या सात लढतीतून पाच विजयांसह 16 गुण आहेत. अग्रस्थानी असलेल्या एटीके मोहन बागानपेक्षा त्यांचा एक गुण कमी आहे. केरळा ब्लास्टर्सला नमविल्यास सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघ पुन्हा पहिल्या क्रमांकावर येईल. मुंबई सिटीचा शेवटचा सामना 20 डिसेंबरला झाला होता, तेव्हा त्यांनी हैदराबाद एफसीला दोन गोलांनी हरविले होते.

किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्सला आयएसएलच्या यंदाच्या मोसमात पहिला विजय नोंदविण्यासाठी सातव्या लढतीपर्यंत वाट पाहावी लागली. बांबोळीतील स्टेडियमवरच त्यांनीही हैदराबाद एफसीला दोन गोलनी हरविले होते. सध्या त्यांचे सात लढतीनंतर सहा गुण झाले असून नववा क्रमांक आहे.

मुंबई सिटीने स्पर्धेत आतापर्यंत 11 गोल नोंदविले आहेत, त्याचवेळी केरळा ब्लास्टर्सने तब्बल 11 गोल स्वीकारले आहे. धडाकेबाज आक्रमक खेळ करणाऱ्या मुंबईच्या संघाविरुद्ध कोचीतील संघाचा बचाव दबावाखाली येऊ शकतो. केरळा ब्लास्टर्सने उत्तरार्धातील खेळात आठ गोल स्वीकारले आहेत, यावरून विश्रांतीनंतर त्यांच्या बचावफळीस तडे जातात हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे त्यांना सावध राहावे लागेल.

आणखी वाचा:

विराट-अजिंक्य दोघेही भारतीय, त्यांच्यात तुलना नको -

दृष्टिक्षेपात...

  • - यंदा स्पर्धेत मुंबई सिटीच्या 4, तर केरळा ब्लास्टर्सच्या 2 क्लीन शीट
  • - मुंबई सिटीच्या अॅडम ली फाँड्रे याचे 5 गोल, त्यापैकी 2 गोल पेनल्टीवर
  • - गतमोसमात कोची येथे मुंबई सिटी 1-0 फरकाने विजयी, तर मुंबईत केरळा ब्लास्टर्सची 1-1 गोलबरोबरी
  • - मुंबई सिटीवर प्रतिस्पर्ध्यांचे आतापर्यंत फक्त 3 गोल, एटीके मोहन बागानशी बरोबरी

संबंधित बातम्या