मुंबई सिटीचे 'आयएसएल'मधील अग्रस्थान भक्कम ; चुरशीच्या लढतीत चेन्नईयीन एफसीवर मात

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

चेन्नईयीन एफसीने तुल्यबळ लढत दिली, पण ते मुंबई सिटीच्या प्रभावी सेटपिसेससमोर निष्प्रभ ठरले. त्यामुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात मुंबईच्या संघाला अग्रस्थान भक्कम करणे शक्य झाले.

पणजी :  चेन्नईयीन एफसीने तुल्यबळ लढत दिली, पण ते मुंबई सिटीच्या प्रभावी सेटपिसेससमोर निष्प्रभ ठरले. त्यामुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात मुंबईच्या संघाला अग्रस्थान भक्कम करणे शक्य झाले. त्यांनी 2-1 फरकाने विजय प्राप्त केला. सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर काल झाला. स्लोव्हाकियन आघाडीपटू याकूब सिल्व्हेस्टर याने 40व्या मिनिटास चेन्नईयीन एफसीचे खाते उघडले, मात्र 45+3 व्या मिनिटास स्पॅनिश मध्यरक्षक हर्नान सांताना याने मुंबई सिटीस बरोबरी साधून दिली. अॅडम ली फाँड्रे याने 75व्या मिनिटास मुंबई सिटीला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. या 34 वर्षीय इंग्लिश आघाडीपटूचा हा यंदाचा चौथा गोल ठरला. मुंबई सिटीचे दोन्ही गोल मध्यरक्षक ह्यूगो बुमूसच्या असिस्टवर झाले.

 

मुंबई सिटीचा हा सलग चौथा विजय ठरला. त्यांचे आता पाच लढतीतून 12 गुण झाले आहेत. त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेड व एटीके मोहन बागानला तीन गुणांनी मागे टाकले आहे. गतउपविजेत्या चेन्नईयीनला दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे चार लढतीनंतर चार गुण कायम राहिले. ते आठव्या स्थानी राहिले. सलग तीन सामने एकही गोल न स्वीकारलेला मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याचा बचाव बुधवारी भेदला गेला. बुधवारी पूर्वार्ध संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना चेन्नईयीनकडून चौथा सामना खेळणाऱ्या याकूब सिल्व्हेस्टरने संधी साधली. या गोलचे श्रेय लाल्लियानझुआला छांगटे याला जाते. या युवा खेळाडूने मुंबई सिटीच्या बचावफळीस गुंगारा देताना उजव्या बाजूने जोरदार मुसंडी मारली आणि नंतर सिल्व्हेस्टरला गोल नोंदविण्याची सुरेख संधी प्राप्त करून दिली. त्यापूर्वी सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटास सिल्व्हेस्टरचा हेडर दिशाहीन ठरल्याने चेन्नईच्या संघाचे नुकसान झाले होते.

 

पूर्वार्धातील इंज्युरी टाईमच्या तिसऱ्या मिनिटास चेन्नईयीनची आघाडी भेदली गेली. मुंबई सिटीने सेटपिसेसवरील वर्चस्व पुन्हा एक प्रदर्शित केले. ह्युगो बुमूसच्या कॉर्नरवर हर्नान सांताना याचे हेडिंग भेदक ठरले. यावेळी गोलरक्षक विशाल कैथने जागा सोडण्याची चूक मुंबई सिटीच्या पथ्यावर पडली. त्याअगोदर 25व्या मिनिटास अॅडम ली फाँड्रेचा फटका गोलरक्षक विशाल कैथ याने अडविल्यानंतर मुंबई सिटीला रिबाऊंडवर आघाडी मिळवून देणे बिपिन सिंगला शक्य होते, पण त्याचा फटका अचूक ठरू शकला नाही.

 

सामना संपण्यास पंधरा मिनिटे बाकी असताना गोलबरोबरीची कोंडी फुटली. अॅडम ली फाँड्रे याने चेंडूला अचूत दिशा दाखविली. अहमद जाहूच्या फ्रीकिवर रॉवलिन बोर्जिसने चेंडू नियंत्रित केल्यानंतर, ह्यूगो बुमूसने ली फाँड्रे याला गोलची संधी प्राप्त करून दिली.  लगेच चार मिनिटांनंतर चेन्नईयीनला बरोबरीची संधी होती, मात्र लाल्लियानझुआला छांगटे याचा ताकदवान फटका मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंगने चपळाईने फोल ठरविला. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये बचावपटू मुर्तदा फॉलच्या भक्कम बचावामुळे चेन्नईयीनच्या सिल्व्हेस्टरला यश मिळू शकले नाही आणि मुंबई सिटीची आघाडी अबाधित राहिली.

 

दृष्टिक्षेपात...

- चेन्नईयीनच्या याकूब सिल्व्हेस्टर याच्या नावे आयएसएलमध्ये 1 गोल

- मुंबई सिटीच्या हर्नान सांताना याचे आयएसएलमध्ये एकूण 2 गोल

- अॅडम ली फाँड्रे याचे यावेळच्या आयएसएलमध्ये 4 गोल

- सलग 3 सामने क्लीन शीट राखलेल्या मुंबई सिटीवर पहिलाच गोल

- 2 लढतीत गोल नोंदविण्यात अपयशी ठरलेल्या चेन्नईयीनचे अखेर यश

- मुंबई सिटीचे सातव्या मोसमात नॉर्थईस्ट युनायटेडइतकेच 8 गोल

 

अधिक वाचा :

नॉर्थईस्ट युनायटेडने बंगळूरला रोखले

 

संबंधित बातम्या