ISL 2020-21 : प्ले ऑफ मध्ये मुंबई सिटीसमोर एफसी गोवाचे आव्हान

दैनिक गोमन्तक
सोमवार, 1 मार्च 2021

एटीके मोहन बागान व नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यात दुसरी उपांत्य लढत

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील प्ले-ऑफ (उपांत्य) फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लीग विनर्स शिल्ड विजेत्या मुंबई सिटीसमोर एफसी गोवाचे आव्हान असेल, तर दुसरी लढत एटीके मोहन बागान आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यात होईल.

उपांत्य फेरीचा पहिला टप्पा पाच व सहा मार्च रोजी, तर दुसरा टप्पा आठ व नऊ मार्च रोजी होईल. अंतिम सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 13 मार्च रोजी खेळला जाईल. प्ले-ऑफ फेरीतील सामने संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळले जातील.

ISL 2020-21 : एटीके मोहन बागानला हरवून मुंबई सिटी एफसी चॅम्पियन्स लीगसाठीही...

मुंबई सिटीचे मुख्य प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा हे एफसी गोवाचे माजी प्रशिक्षक आहेत. गतमोसमातील साखळी फेरीचे काही सामने बाकी असताना एफसी गोवाने त्यांना प्रशिक्षकपदावरून काढले होते. त्यानंतर एफसी गोवा संघ गतमोसमात लीग विनर्स शिल्ड विजेता ठरला होता. यंदा लोबेरा मुंबई सिटीचे प्रशिक्षक असून माजी संघाविरुद्ध त्यांच्या संघाची उपांत्य फेरीत गाठ पडत असल्यामुळे लढतीबाबत उत्सुकता आहे. एफसी गोवास यंदा साखळी फेरीत चौथा क्रमांक मिळाला. एटीके मोहन बागान सघ दुसऱ्या, तर नॉर्थईस्ट युनायटेड संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

प्ले-ऑफ फेरीचे वेळापत्रक 
तारीख 5 मार्च : एफसी गोवा विरुद्ध मुंबई सिटी (फातोर्डा)
तारीख 6 मार्च : नॉर्थईस्ट युनायटेड विरुद्ध एटीके मोहन बागान (बांबोळी)
तारीख 8 मार्च : मुंबई सिटी विरुद्ध एफसी गोवा (बांबोळी)
तारीख 9 मार्च : एटीके मोहन बागान विरुद्ध नॉर्थईस्ट युनायटेड (फातोर्डा)
तारीख 13 मार्च : अंतिम सामना (फातोर्डा)

संबंधित बातम्या