`टेन मेन` जमशेदपूरचा भक्कम खेळ

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

सामन्याची तब्बल 62 मिनिटे दहा खेळाडूंसह खेळूनही जमशेदपूर एफसीने मुंबई सिटी एफसीचे आक्रमण यशस्वीपणे थोपविले.

पणजी : सामन्याची तब्बल 62 मिनिटे दहा खेळाडूंसह खेळूनही जमशेदपूर एफसीने मुंबई सिटी एफसीचे आक्रमण यशस्वीपणे थोपविले. त्यामुळे त्यांना इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सोमवारी 1-1 बरोबरीसह एक गुण विभागून घेता आला. या निकालानंतरही मुंबई सिटीचे अग्रस्थान कायम राहिले.

सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. लिथुआनियन आघाडीपटू नेरियूस व्हॅल्सकिस नवव्या मिनिटास जमशेदपूरला आघाडी मिळवून दिली, मात्र लगेच 15व्या मिनिटास नायजेरियन बार्थोलोमेव ओगबेचे याच्या गोलमुळे मुंबई सिटीने बरोबरी साधली. जमशेदपूरच्या एतॉर मॉनरॉय याला 28व्या मिनिटास सामन्यातील दुसरे यलो कार्ड मिळाल्यामुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले. त्याला पहिले यलो कार्ड 14व्या मिनिटास मिळाले होते. जमशेदपूरच्या बचावफळीत कणखर ठरलेला कर्णधार पीटर हार्टली सामन्याचा मानकरी ठरला.

मुंबईची ही पहिलीच बरोबरी ठरली. त्यांचे आता सहा सामन्यातून १३ गुण झाले असून अग्रस्थान अबाधित राहिले आहे. जमशेदपूरचा ही सहा लढतीतील चौथी बरोबरी ठरली. त्यांचे सात गुण झाले असून सहाव्या क्रमांकावर आले आहेत.

मुंबई सिटीस सोमवारी त्यांचा हुकमी मध्यरक्षक ह्यूगो बुमूस याची अनुपस्थिती जाणवली. एक खेळाडू कमी होऊनही जमशेदपूरने तोल ढळू न देता भक्कम बचाव प्रदर्शित केला. सामन्याच्या अंतिम टप्प्यात त्यांचा गोलरक्षक टीपी रेहेनेश याची एकाग्रताही निर्णायक ठरली. सामन्याची शेवटची अकरा मिनिटे बाकी असताना व्हॅल्सकिसने यंदाच्या स्पर्धेतील वैयक्तिक सातवा गोल केला होता, पण तो ऑफसाईड ठरल्याने जमशेदपूरला आघाडीचा जल्लोष करता आला नाही.

सामन्यातील पहिला गोल जमशेदपूरने नोंदविला. जॅकिचंद सिंगच्या असिस्टवर नेरियूस व्हॅल्सकिस याने स्टील सिटीतील संघाला आघाडी मिळवून दिली. यावेळी कौशल्यपूर्ण वेगवान व्हॅल्सकिसला रोखणे मुंबई सिटीच्या मेहताब सिंग याला शक्य झाले नाही. खरं म्हणजे यावेळी मुंबई सिटीच्या ओगबेचे याची चूक जमशेदपूरच्या पथ्यावर पडली होती. ओगबेचे याचा चुकलेल्या बॅकपासवर जॅकिचंदने वेळीच ताबा मिळवत व्हॅल्सकिसला चेंडूचा ताबा मिळवून दिला.

जमशेदपूरचा आघाडी घेतल्याचा आनंद सहा मिनिटेच टिकला. बिपिन सिंगच्या असिस्टवर बार्थोलोमेव ओगबेचे याने मुंबई सिटीस बरोबरी साधून दिली. बिपिनच्या पासवर अनमार्क असलेल्या बार्थोलोमेवने चेंडूवर अफलातून नियंत्रण राखत गोलरक्षक टीपी रेहेनेश याचा बचाव भेदला.

अगोदर यलो कार्ड मिळालेल्या मॉनरॉय याला दुसऱ्यांदा ओगबेचे याला मैदानावर पाडण्याची चूक महागात पडली. पहिल्या यलो कार्डवेळी मुंबई सिटीच्या गोडार्डला चुकीच्या पद्धतीने पाडले होते.

तासाभराच्या खेळानंतर जमशेदपूरचा बचावपटू स्टीफन इझे याच्या चपळाईमुळे गोलबरोबरीची कोंडी कायम राहिली. नेटसमोर गोल करण्याची मुंबई सिटीच्या विग्नेश दक्षिणमूर्ती याला गोल करण्याची चांगली संधी होती, मात्र इझे याने वेगाने चेंडूवर ताबा मिळवत प्रतिस्पर्ध्यांची संधी नाकारली. त्यानंतर लगेच पुढच्या मिनिटास मुंबई सिटीच्या रॉवलिन बोर्जिसने गोल करण्याची सोपी संधी गमावली.

दृष्टिक्षेपात...

 

  • - जमशेदपूरच्या नॅरियूस व्हॅल्सकिसचे यंदा 6 गोल, एफसी गोवाच्या इगोर आंगुलोस गाठले
  • - व्हॅल्सकिस याचे आयएसएल स्पर्धेतील 26 सामन्यांत एकूण 21 गोल
  • - मुंबई सिटीच्या बार्थोलोमेव ओगबेचे याचे यंदा 2 गोल, आयएसएलमधील 40 लढतीत 29 गोल
  • - यंदा मुंबई सिटीचे 9, तर जमशेदपूरचे 6 गोल

संबंधित बातम्या