ISL2020-21 : एकाच मोसमात आयएसएल करंडक व लीग विनर्स शिल्ड जिंकण्याचा मुंबई सिटीचा पराक्रम

ISL2020-21 : एकाच मोसमात आयएसएल करंडक व लीग विनर्स शिल्ड जिंकण्याचा मुंबई सिटीचा पराक्रम
ISL

पणजी : सामन्याच्या शेवटच्या मिनिटास एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याने जागा सोडणे एटीके मोहन बागानला चांगलेच महागात पडले. त्याचा लाभ उठवत मणिपूरच्या बिपिन सिंग याने मुंबई सिटीच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) विजेतेपदावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला. प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांचे विजेतेपदाचे स्वप्न साकार करताना मुंबईच्या संघाने 2 - 1 फरकाने विजय नोंदवत एकाच मोसमात लीग विनर्स शिल्ड आणि आयएसएल करंडक जिंकण्याचा पराक्रम साधला.

अंतिम सामना शनिवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. सामन्याच्या 18व्या मिनिटास ऑस्ट्रेलियन डेव्हिड विल्यम्स याने एटीके मोहन बागानला आघाडी मिळवून दिल्यानंतर 29व्या मिनिटास स्पॅनिश बचावपटू टिरी याच्या स्वयंगोलमुळे मुंबई सिटीस बरोबरी साधता आली. सामन्याच्या 90व्या मिनिटास बदली खेळाडू बार्थोलोमेव ओगबेचे याच्या असिस्टवर 26 वर्षीय बिपिनने प्रतिस्पर्धी गोलरक्षकाची चुकीला लाभ उठवत मुंबई सिटीच्या विजेतेपद निश्चित केले. बिपिन सामन्याचा मानकरी ठरला. आयएसएल स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरी गाठून विजेतेपद मिळविण्याची किमया मुंबई सिटीने साधली. एफसी गोवाचे प्रशिक्षक असताना लोबेरा यांना 2018-19 मोसमात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

पूर्वार्धात गोलबरोबरी

सामन्याच्या पूर्वार्धात अकरा मिनिटांत दोन गोल झाल्यामुळे बरोबरीची कोंडी कायम राहिली. दोन्ही संघांच्या बचावफळीतील चुकीमुळे हे गोल झाले. एटीके मोहन बागानने 18व्या मिनिटास आाघाडी घेतली. फिजीयन रॉय कृष्णा आणि ऑस्ट्रेलियन डेव्हिड विल्यम्स यांच्या संयुक्त  प्रयत्नावर हा गोल झाला. मुंबई सिटीच्या अहमद जाहू याची चुकी कोलकात्यातील संघाच्या पथ्यावर पडली. मुर्तदा फॉलकडून चेंडू मिळाल्यानंतर जाहू नियंत्रण राखू शकला नाही. त्याचा लाभ उठवत कृष्णा याने विल्यम्सला गोल करण्याची संधी प्राप्त करून दिली. पूर्वार्धातील कुलिंग ब्रेकपूर्वी स्पॅनिश बचावपटू टिरी याच्या स्वयंगोलमुळे एटीके मोहन बागानला धक्का बसला. मुंबई सिटी संघातील खेळाडूचा फटका दिशाहीन करण्याऐवजी टिरी याने आपल्याच संघाच्या नेटमध्ये हेडिंग साधले हे पाहून त्याचा सहकारी गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज पूर्णपणे गडबडून गेला. सामन्याच्या 36व्या मिनिटास बिपिन सिंग याला हेडिंग अचूकपणे साधता आले नाही, त्यामुळे मुंबई सिटीने आघाडी घेण्याची चांगली संधी गमावली. त्यापूर्वी 31व्या मिनिटास मुंबई सिटीच्या ह्युगो बुमूस याला प्रयत्न एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याने उधळला होता.

राकिपचा स्वयंगोल अवैध

सामन्याच्या तासाभराच्या खेळानंतर एटीके मोहन बागानच्या हावियर हर्नांडेझ याच्या फ्रीकिकवर मुंबई सिटीचा बदली खेळाडू महंमद राकिप याने चेंडूला आपल्याच संघाच्या नेटची दिशा दाखविली. पण रेफरी तेजस नागवेकर यांनी सहाय्यक रेफरीशी चर्चा करून हा गोल अवैध ठरविला, यावेळी एटीके मोहन बागानच्या रॉय कृष्णा याने मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याला अडथळा आणल्याचे, तसेच ऑफसाईड असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बरोबरी कायम राहिली. त्यापूर्वी दोन वेळा मुंबई सिटीला आघाडी घेता आली नाही. 58व्या मिनिटास ह्युगो बुमूसने समोर फक्त गोलरक्षक असताना रिबाऊंडवर चेंडू गोलपट्टीवरून मारला, त्यापूर्वी 56व्या मिनिटास हर्नान सांतानाचा फ्रीकिक फटका एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्जने यशस्वी ठरू दिला नाही.

रुग्णवाहिका मैदानावर 

सामन्याच्या पूर्वार्धातील इंज्युरी टाईममध्ये मुंबई सिटीचा बचावपटू अमेय रानावडे याला दुखापत झाल्यामुळे त्याला मैदानावरून रुग्णवाहिकेतून हलवावे लागले. दुखापतीमुळे हा युवा खेळाडू काही काळ मैदानावर निपचित पडला. त्यावेळी चिंतेचे वातावरण होते, नंतर तो स्वतःच्या पायावर उभा राहिला, पण सुरक्षिततेच्या कारणास्तव पुढील उपचारासाठी त्याला रुग्णवाहिकेतून न्यावे लागले. अमेयची प्रकृती स्थिर असून इस्पितळात त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली.

दृष्टिक्षेपात...

- आयएसएल इतिहासात तीन अंतिम लढती होणारे फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम पहिले

- यापूर्वी या स्टेडियमवर 20 डिसेंबर 2015 आणि 14 मार्च 2020 रोजी अंतिम लढत

- एटीके मोहन बागानचा डेव्हिड विल्यम्स याचे मोसमातील 20 लढतीत 6 गोल

- एटीके मोहन बागानच्या रॉय कृष्णा याचे मोसमात 8 असिस्ट, एफसी गोवाच्या आल्बर्टो नोगेराशी बरोबरी

- ओडिशा एफसीविरुद्ध साखळी फेरीत स्पर्धेतील एकमेव हॅटट्रिक नोंदविलेल्या बिपिन सिंगचे मोसमातील 22 लढतीत 6 गोल

- यंदा आयएसएल स्पर्धेत मुंबई सिटीचे सर्वाधिक 39 गोल, एटीके मोहन बागानचे 32 गोल

- एटीके मोहन बागानचे मुख्य प्रशिक्षक अंतोनियो हबास यापूर्वी 2 वेळा आयएसएल विजेते, एटीके एफसीचे प्रशिक्षक या नात्याने 2014 व 2019-20 मध्ये करंडक

- गोव्याचे तेजस नागवेकर अंतिम सामन्यात मुख्य रेफरी

आयएसएल विजेते

- एटीके एफसी 3 वेळा :2014, 2016 व 2019-20

- चेन्नईयीन एफसी 2 वेळा :2015 व 2017-18

- बंगळूर एफसी 1 वेळ :2018-19

- मुंबई सिटी एफसी 1 वेळ :2020-21

आयएसएलमधील बक्षिसे 
- स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : रॉय कृष्णा (एटीके मोहन बागान, 23 सामने, 14 गोल, 8 असिस्ट)
- गोल्डन बूट : इगोर आंगुलो (एफसी गोवा, 21 सामन्यांत 14 गोल)
- गोल्डन ग्लोव्ह : अरिंदम भट्टाचार्ज (एटीके मोहन बागान, 10 क्लीन शीट्स)
- उत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू : अपुया (नॉर्थईस्ट युनायटेड)
- विजेत्या मुंबई सिटीस 8 कोटी रुपये
- उपविजेत्या एटीके मोहन बागानला 4 कोटी रुपये
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com