अव्वल स्थान कायम ठेवण्याचे मुंबईचे लक्ष्य

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

गुरुवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाताचा पराभव केला आणि यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये स्थान निश्‍चित झालेला मुंबई पहिला संघ ठरला. पहिले उद्दिष्ट गाठल्याचे समाधान असताना मुंबईचा उद्या दिल्लीविरुद्ध सामना होत आहे. ‘क्‍लॉलिफायर-१’ सामन्यात खेळण्याची संधी यासाठी आता पहिले स्थान कायम ठेवण्याचे लक्ष्य मुंबईने ठेवले आहे.

दुबई :  गुरुवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाताचा पराभव केला आणि यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये स्थान निश्‍चित झालेला मुंबई पहिला संघ ठरला. पहिले उद्दिष्ट गाठल्याचे समाधान असताना मुंबईचा उद्या दिल्लीविरुद्ध सामना होत आहे. ‘क्‍लॉलिफायर-१’ सामन्यात खेळण्याची संधी यासाठी आता पहिले स्थान कायम ठेवण्याचे लक्ष्य मुंबईने ठेवले आहे.

पहिल्या दोन संघांत क्‍लॉलिफायर-१ चा सामना होत असतो. मुंबईला ही संधी मिळण्याची शक्‍यता इतरांपेक्षा अधिक आहे, तरीही उद्याचा सामना जिंकून त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुंबईचा संघ मैदानात उतरेल. दुसऱ्या बाजला दिल्लीचे अस्तित्व पणास लागले आहे.

उद्याचा सामना मिळून दिल्लीचे दोन सामने शिल्लक आहेत, हे दोन्ही सामने गमावले आणि पंजाब, कोलकाताने त्यांचे सामने जिंकले तर दिल्ली स्पर्धेबाहेर जाऊ शकते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी दिल्लीही उद्या प्रयत्न करणार हे निश्‍चित 
आहे.

मुंबई संघात बदल करणार?
बाद फेरी निश्‍चित झाल्यामुळे मुंबई संघात प्रामुख्याने वेगवान गोलंदाजीत बदल केले जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जसप्रित बुमरा आणि ट्रेंट बोल्ट सलग १२ सामने खेळले आहेत, त्यामुळे त्यांच्यावरचा ताण कमी करण्यासाठी पुढील दोन सामन्यांत या दोघांना आलटून पालटून विश्रांती दिली जाऊ शकते. 

सूर्यकुमारवर लक्ष
बंगळूरविरुद्ध कमालीची लाजवाब खेळी करून सर्वांचे लक्ष वेधून घेणार सूर्यकुमार यादव आता सातत्य कसे राखतो याची उत्सुकता आहे. मुळात त्याने यंदाच्याही स्पर्धेत सातत्य राखले आहे, पण आता निवड समितीला आपली चूक मान्य करायला लावण्यासाठी सूर्यकुमारला पुन्हा मॅचविनिंग खेळी करावी लागणार आहे. 

रोहितची विश्रांतीच?
रोहित शर्मा नेटमध्ये सराव करून तंदुरुस्तीच्या मार्गावर असला तरी तो उद्याच्या सामन्यात खेळण्याची धोका स्वीकारणार नाही, विश्रांतीसाठी अजून दोन दिवस घेईल आणि अखेरच्या साखळी सामन्यातून (३ नोव्हेंबर) पुनरागमन करण्याची शक्‍यता आहे.

संबंधित बातम्या