मंबई: अमिरातीत हवामान सध्या उष्ण आहे, तसेच तीनच स्टेडियमवर सामने होणार असल्यामुळे खेळपट्याही हळूहळू संथ होतील, अशा आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करून शनिवारपासून सुरू होणाऱ्या आयपीएलचा सामना करावा लागणार आहे, असे मत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले.
गतविजेत्या मुंबई इंडियन्सची तयारी पूर्ण होत आली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी अबुधाबीतून वेबिनारद्वारे मुंबईतील पत्रकारांशी संवाद साधला.
ही आयपीएल फारच वेगळी असणार आहे, एकीकडे कोरोनाची भीती आहेच, पण त्याचवेळी देशात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या क्रिकेटच्या आवडत्या आयपीएलद्वारे सर्वांचा मूडही आनंदी करायचा आहे, असे रोहितने सांगितले. ही आयपीएल कशी असेल याबाबत बोलताना रोहित म्हणाला, येथील हवामान उष्ण आणि दमट आहे, तसेच खेळपट्ट्या सातत्याने खेळून संथ होत जातील, त्यामुळे धावा करणे सोपे जाणार नाही.
आशिया स्पर्धेचा अनुभव
दोन वर्षांपूर्वी आम्ही येथे आशिया करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्यावेळीही खेळपट्ट्या अशाच संथ झालेल्या होत्या. त्या स्पर्धेत सलामीची लढत झालेल्या आणि अंतिम सामन्यातील खेळपट्टीच्या स्वरूपात मोठा बदल झाला होता. त्यामुळे आता खेळपट्टी नेमकी किती धावा निर्णायक ठरवणारी असेल हे समजणे महत्त्वाचे असेल, असे रोहितने सांगितले.
‘तो’ इतिहास होता
२०१४ च्या आयपीएलचा पहिला टप्पा अमिरातीत झाला होता, त्यावेळी मुंबईची कामगिरी फारच सुमार झाली होती. याबाबत विचारले असता रोहितने सांगितले, त्या वेळच्या आणि आत्ताच्या मुंबई संघात मोठा बदल झाला आहे. मी आणि पोलार्ड हेच दोन खेळाडू आताच्या संघात आहोत, तसेच त्यावेळी बुमराही एकच सामना खेळला होता.
सलामीलाच खेळणार
डिकॉक, ख्रिस लीन असे सलामीवर असताना तू सलामीला खेळणार का? या प्रश्नावर रोहितने होकारार्थी उत्तर दिले असले तरी संघाच्या गरजेनुसार आपण कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करायला तयार असतो हे केवळ मुंबई इंडियन्सबाबतच नाही तर टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनालाही माझी ही भूमिका सांगितलेली आहे.
मुंबई इंडियन्स एक कुटुंब
मुंबई इंडियन्सने आमचीच नव्हे तर आमच्या कुटुंबासाठीच्याही उत्तम सुविधा येथे दिल्या आहेत. जिमपासून, मनोरंजनापर्यंत आणि सरावाच्या सर्व उत्तम सुविधा तयार केल्या आहेत. कुटुंबाप्रमाणे आमची काळजी येथे घेतली जात आहे, असे रोहितने नमूद केले.
सुरक्षित राहा... सावध राहा
अमिरातीत आल्यापासून आम्ही जैव सुरक्षा वातावरणात राहात आहोत, सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत आहोत, भारतातही सरकारकडून सांगण्यात येत असलेल्या सर्व नियमांचे पालन करा, सावध राहा आणि आयपीएलचा आनंद घ्या, असा सल्ला रोहितने दिला आहे.