मुंबईकडून दिल्लीचा धुव्वा

Mumbai Indians beats Delhi Capitals
Mumbai Indians beats Delhi Capitals

दुबई :  कमालीचा वेग पकडणाऱ्या मुंबई इंडियन्सने दिल्लीचा धुव्वा उडवत गुणतक्‍त्यातले अव्वल स्थान तर कायम ठेवलेच, पण त्याचबरोबर क्‍लॉलिफायर-१ हा महत्त्वाच्या सामन्यातील आपली जागाही पक्की केली. दिल्लीला ११० धावांत रोखणाऱ्या मुंबईने नऊ विकेटने विजय मिळवला.


प्रमुख फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीतही मुंबई एक्‍स्प्रेसने कमालीचा वेग पकडला आहे. काही सामन्यांपूर्वी ताकदवर असलेल्या दिल्लीला प्रतिकाराचीही संधी दिली नाही. ३२ चेंडू राखून हा विजय मिळवला. जसप्रित बुमरा आणि टेंट्र बोल्ट यांचे प्रत्येकी तीन विकेट त्यानंतर ईशान किशनचे वेगवान अर्धशतक मुंबईच्या या एकतर्फी विजयाचे प्रमुख घटक ठरले.

दिल्लीची वाट बिकट
या पराभवामुळे दिल्लीची वाट आता आणखी बिकट झाली आहे. सलग चौथ्या पराभवास त्यांना समोरे जावे लागले, त्याचबरोबर पराभवाच्या मोठ्या अंतराने त्यांची सरासरीही कमजोर झाली. दिल्लीचा आता बंगळूरविरुद्ध अखेरचा साखळी सामना शिल्लक आहे.

दिल्ली फलंदाजांनी शरणागती
मुंबईच्या गोलंदाजांनी हा विजय एकदमच सोपा केला. सुरुवातीला बोल्ट आणि डावाच्या मध्यावर बुमरा यांच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. दिल्लीने आज संघात बदल करताना अजिंक्‍य रहाणेऐवजी पृथ्वी शॉला संधी दिली, पण आतताई फटका मारताना त्याने विकेट गमावली, त्याअगोदर बोल्टने पहिल्याच षटकात शिखर धवनला शून्यावर बाद केले. सूर्यकुमारने त्याचा अप्रतिम झेल पकडला. 

श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण धावांच्या गतीला ब्रेक लागला होता. या दोघांवर दिल्लीच्या आशा अवलंबून होत्या, परंतु चहरने अय्यरला बाद केल्यावर बुमराच्या वादळासमोर दिल्लीची उरली-सुरली फलंदाजीही कोलमडली. स्टॉयनिस आणि रिषभ पंतला बाद केल्यावर बुमारची गोलंदाजी खेळणे दिल्ली फलंदाजांना अवघड जात होते. 

ईशान किशन प्रभावी
१११ धावांचे आव्हान मुंबई किती षटकात पार करणार याचीच उत्सुकता होती. समोर रबाडा आणि नॉर्किया असे गोलंदाज असल्यामुळे डिकॉक आणि ईशान किशन यांनी सावध सुरुवात केली; पण ईशान काही वेळातच या गोलंदाजांसह सर्वांवर तुटून पडला. त्याने मारलेले काही षटकार नजरेचे पारणे फेडणारे होते. स्पर्धेतील सर्वात वेगवान गोलंदाज नॉर्कियाला उत्तुंग षटकार मारून त्याने विजयावर शिक्कामोर्तब केले. 

संक्षिप्त धावफलक ः दिल्ली ः २० षटकांत ९ बाद ११० (पृथ्वी शॉ १०, श्रेयस अय्यर २५, रिषभ पंत २१, आर. अश्‍विन १२, टेंट्र बोल्ट ४-०-२१-३, जसप्रित बुमरा ४-०-१७-३, कुल्टर नाईल २-०-१४-१) पराभूत वि. मुंबई ः १४.२ षटकांत १ बाद १११ (ईशान किशन नाबाद ७२ -४७ चेंडू, ८ चौकार, ३ षटकार, क्विन्टॉन डिकॉक २६ -२८ चेंडू, २ चौकार, सूर्यकुमार यादव नाबाद १२ -११ चेंडू, १ चौकार).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com