‘टेबलटॉपर’ मुंबई इंडियन्सची खरी लढाई सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

साखळी सामने संपता संपता पराभवाचा स्पीडब्रेकर सहन करावा लागलेल्या गतविजेत्या आणि ‘टेबलटॉपर’ मुंबई इंडियन्स संघाच्या मानसिकतेची आता खरी लढाई सुरू होत आहे. साखळीतील दोन्ही सामन्यांत पराभूत केलेले असले तरी दिल्लीला कमी लेखून चालणार नाही.

दुबई  : साखळी सामने संपता संपता पराभवाचा स्पीडब्रेकर सहन करावा लागलेल्या गतविजेत्या आणि ‘टेबलटॉपर’ मुंबई इंडियन्स संघाच्या मानसिकतेची आता खरी लढाई सुरू होत आहे. साखळीतील दोन्ही सामन्यांत पराभूत केलेले असले तरी दिल्लीला कमी लेखून चालणार नाही.

बाद फेरीचे सामने ही एक वेगळी स्पर्धा असते, असे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा काही दिवसांपूर्वीच म्हणाला होता. म्हणजेच बाद फेरीचे दडपण काय असते याची जाणीव त्याला आहे. बाद फेरीचे सामने खेळण्याचा असलेला अनुभव मुंबईला उद्या फायदेशीर ठरू शकतो, पण दिल्लीकडून होणारा पलटवर यासाठी त्यांना सावध राहावे लागणार आहे.

हैदराबादकडून झालेल्या पराभवामुळे मुंबई संघाला आपल्या रणनीतीचा फेरविचार करायला लावणारा आहे. बुमरा आणि बोल्ट हे अनुभवी गोलंदाज कालच्या विश्रांतीनंतर पुन्हा खेळणार आहेत, त्यामुळे मुंबईची गोलंदाजी पुन्हा ताकदवर होईल; मात्र हैदरबादविरुद्ध बुमरा-बोल्टशिवाय खेळणाऱ्या गोलंदाजांना एकही विकेट न मिळणे हे चिंतेचे कारण ठरू शकेल.

हार्दिक पंड्या तंदुरुस्त?
हार्दिक पंड्या गेल्या दोन सामन्यांत खेळलेला नाही त्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. ऑस्ट्रेलिया दौरा समोर असताना हार्दिकला रोहितप्रमाणे तंदुरुस्तीबरोबर फॉर्मही दाखवावा लागणार आहे. 

दिल्लीची गाडी रुळावर?
सलग चार पराभवांनंतर दिल्लीने बंगळूरचा पराभव करून प्लेऑफसाठी स्थान मिळवले. शिखर धवन आणि अजिंक्‍य रहाणे यांचे अर्धशतक महत्त्वाचे ठरले होते, परंतु पृथ्वी शॉचे अपयश चिंता वाढवणारे आहे. उद्या कदाचित त्याला वगळण्याची शक्‍यता आहे.

रोहितला आता धावा कराव्या लागतील
कर्णधार रोहित शर्माने हैदराबादविरुद्ध खेळून तंदुरुस्ती दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु फलंदाजीसाठी तो सातच चेंडू मैदानात होता. दुखापत होण्याअगोदरही त्याच्या कामगिरीत सातत्य नव्हते. आता महत्त्वाचे सामने सुरू होत असल्याने रोहितला फॉर्मही सिद्ध करावा लागणार आहे.

संबंधित बातम्या