दुबई- सलग पाच विजय मिळवून प्रगती करणाऱ्या मुंबई इंडियन्सची गाडी १४ गुणांवर थांबली आहे. बंगळूरही तेवढ्याच गुणांवर आहे. उद्या या दोघांत होणाऱ्या सामन्यातून विजयी संघ प्लेऑफमधील स्थान निश्चित करणार आहे, परंतु विराट कोहलीबरोबर होणाऱ्या या सामन्यात रोहित शर्मा खेळणार का? हा सर्वांसाठी उत्सुकतेचा प्रश्न आहे.
आयपीएलची प्लेऑफ शर्यत निर्णायक टप्प्यावर आली आहे. मुंबईप्रमाणे बंगळूरही बाद फेरीत स्थान मिळवणार अशी आताची आकडेवारी स्पष्ट करत आहे, परंतु त्यासाठी त्यांना एका विजयाची आणि पहिल्या दोन क्रमांकांवर स्थान मिळवण्यासाठी पुढील सामन्यातही विजयाची गरज आहे.
मुंबई आणि बंगळूर या दोघांचे अगोदरच्या सामन्यात पराभव झाले आहेत, त्यामुळे विजयी मार्गावर येण्यासाठी दोघांकडून जोरदार प्रयत्न होणार हे निश्चित आहे. विजयाबरोबर सरासरीही उंचावण्यावर दोघांचा भर असेल. सध्या तरी मुंबईची सरासरी सर्वांपेक्षा सरस आहे.
सुपर ओव्हरचा निकाल
मुंबई-बंगळूर यांच्यातील पहिल्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये झाला होता. त्यात बंगळूरने बाजी मारली होती. त्या वेळी झालेल्या चुका उद्या सुधारण्यासाठी मुंबईचा संघ प्रयत्नशील असेल, परंतु त्यासाठी प्रामुख्याने गोलंदाजीत सुधारणा करणे आवश्यक असणार आहे. राजस्थानविरुद्धच्या गेल्या सामन्यात त्यांना १९५ धावांचेही संरक्षण करता आले नव्हते. उद्या विराट आणि डिव्हिल्यर्सचा सामना करायचा असल्याने अधिक अचुकता आणावी लागणार आहे.
हवामानाचा अंदाज- अपेक्षित तापमान २८ अंश; तर आर्द्रता ५९ टक्के. उकाड्याचा काहीसा त्रास होणार, दवाचेही आव्हान अपेक्षित
खेळपट्टीचा अंदाज - फलंदाजांना तसेच गोलंदाजांना समान साथ. जम बसल्यावर फटकेबाजी करणे चांगले. धावा करणे दुसऱ्या डावात कठीण.
नेमके काय आहे प्रकरण
1 रोहितच्या दुखापतीची माहीती समजल्यावर कोणताही धोका न पत्करण्याची बीसीसीआयचा रोहीतला सल्ला दिल्याची सूत्रांची माहिती
2 आयपीएलमध्ये सराव लवकर सुरू केल्यास ऑस्ट्रेलिया दौरा संकटात येईल, असा इशारा दिल्याचेही संकेत
3 रोहित अनफिट असेल, तर मुंबई इंडियन्सकडून सरावाचा
व्हिडीओ कसा प्रसारित
4 रोहितच्या तंदुरुस्तीचा आढावा घेतला जाणार असेल, तर मर्यादित षटकांच्या लढतीसाठी केएल राहुल उपकर्णधार कसा
5 फेब्रुवारीत रोहीतला स्नायू दुखावल्याने न्यूझीलंड दौरा अर्धवट सोडून परतावे लागले होते; मात्र त्या वेळच्या तुलनेत या वेळची दुखापत सौम्य असल्याचा काहींचा दावा
मुंबई आणि बंगळूर यांच्याविषयी आणखी थोडे-
- ११ सामन्यांत मुंबई तसेच बंगळूरचे प्रत्येकी सात विजय आणि चार पराभव
- यापूर्वीच्या सामन्यात मुंबईची राजस्थानविरुद्ध आठ विकेटनी हार; तर बंगळूरचा चेन्नईविरुद्ध आठ विकेटनी पराभव
- या स्पर्धेतील प्रतिस्पर्ध्यांतील यापूर्वीची लढत बरोबरीत, सुपर ओव्हरमध्ये बंगळूर विजयी
- प्रतिस्पर्ध्यांतील गेल्या पाच लढतीत मुंबईचे तीन विजय; तर बंगळूरचे दोन