ते येतात, खेळतात आणि जिंकून जातात..; अंतिम सामन्यात मुंबईचा दिल्लीवर सहज विजय

mumbai indians
mumbai indians

दुबई- आवाज कोणाचा मुंबईचा.....अशा थाटात मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील आपली मक्तेदारी सिद्ध केली. फाईव्हस्टार कामगिरी करताना सर्वाधिक पाच वेळा अजिंक्‍यपदाचा बहुमान मिळवला. प्रथमच अंतिम सामना खेळणाऱ्या दिल्लीचा पाच विकेटने पराभव करणाऱ्या मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने ६८ धावांची बहुमोल खेळी केली. पण विजेतेपदात सर्वच खेळाडूंनी योगदान दिले.

२०१३ पासून विजेतेपदाची आपली मोहिम सुरू करमाऱ्या मुंबईसमोर दिल्लीने आज पुन्हा एकदा शरणागती स्वीकारली. कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी अर्धशतके करत केलेली ९६ धावांची भागीदारी केली त्यामुळे दिल्लीने १५६ धावा केल्या पण मुंबईने हे आव्हान नऊ चेंडू राखून पार केले. रोहितने ६८ धावा केल्या त्याला डिकॉक, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांचेही योगदान निर्णायक ठरले.
धावांचे कितीही आव्हान असले तरी आक्रमक पवित्रा अवलंबण्याचे सुत्र डिकॉकने कायम ठेवले त्याने आपल्याच देशाच्या कागिसो रबाडावर हल्ला केला तर रोहितने अश्‍विनचे चेंडू भिरकावून दिले. दोन्ही बाजूने आक्रमण सुरू झाल्यामुळे मुंबईची धावांची गती दहा धावांच्या सरासरीने पळत होती. पाचव्या षटकांत गोलंदाजीस आलेल्या स्टॉयनिसने आपल्या पहिल्याच चेंडूवर डिकॉकला बाद केले. 

सुर्यकुमारने आल्या आल्या स्टॉयनिसवर आक्रमण केले. मुंबईला अपेक्षित असलेली सुरुवात मिळाली होती. सर्व काही व्यवस्थित सुरू होते. मध्येच निर्धाव चेंडू गेल्यावर रोहित लगेचच षटकार किंवा चौकार मारुन भरपाई करत होता, परंतु तेवढ्याच रोहितच्या चुकीमुळे सूर्यकुमार धावचीत झाला, पण ईशान किशानने रोहितसह विजय सुकर केला. विजय समीप आल्यावर रोहित, पोलार्ड, आणि पंड्या बाद झाले तरीही विजेतेपद केवळ औपचारिकता होती. 

श्रेयस-पंतची भागीदारी

संघाची सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत श्रेयसने ५० चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांसह नाबाद ६५ धावा केल्या त्याने चौथ्या विकेटसाठी रिषभ पंतसह केलेली ९६ धावांची भागीदारी दिल्लीचा डाव सारवणारी ठरली पंतनेही ३८ चेंडूत ५६ धावांचा तडाखा दिला.  नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम फलंदाजी स्वीकारली खरी, परंतु बोल्टने त्यांचे नटबोल्ड ढिले करण्यास सुरुवात केली. पहिल्याच चेंडूवर त्याने धोकादायक मार्कस स्टॉयनिसला बाद केले. त्यानंतर अजिंक्‍य रहाणेला आल्यापायी माघारी घाडले.  मुंबईने आज संघात एकमेव बदल केला आणि राहुल चहरऐवजी जयंत यादवला संधी त्याने डावाच्या चौथ्या षटकात तो गोलंदाजीस आला आणि तिसऱ्याच चेंडूवर त्याने शिखर धवनच्या यष्टींचा वेध घेतला. हे तीन फलंदाज बाद झाल्याने दिल्लीवर दडपण येईल असे चित्र होते, परंतु श्रेयस आणि रिषभ यांनी दडपण झुगारत आक्रमण सुरु केली. बघता बघता त्यांनी संघाला शंभरच्या पुढे मजल मारुन दिली. कुल्टर नाईलने पंतला बाद करुन ही जोडी फोडली. त्यानंतर येणाऱ्या हेटमायर आणि अक्षर पटेल यांना फार चमक दाखवता आली नाही, परंतु दुसऱ्या बाजूने श्रेयसने आपले आक्रमण कायम ठेवले त्यामुळे दिल्लीला दीडशेच्या पलिकडे मजल मारता आली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com