राजस्थानसमोर मुंबईचे आव्हान

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

आयपीएलच्या प्ले ऑफच्या आशा बाळगण्यासाठी राजस्थान रॉयल्सला विजयाशिवाय पर्याय नाही. आता या परिस्थितीत त्यांच्यासमोर उद्या आघाडीवरील मुंबई इंडियन्सचे आव्हान असेल.

शारजा: आयपीएलच्या प्ले ऑफच्या आशा बाळगण्यासाठी राजस्थान रॉयल्सला विजयाशिवाय पर्याय नाही. आता या परिस्थितीत त्यांच्यासमोर उद्या आघाडीवरील मुंबई इंडियन्सचे आव्हान असेल. त्यापूर्वी उद्या विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी हे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि चेन्नई सुपर किंग्ज लढतीच्या निमित्ताने एकमेकांसमोर येतील.

आपल्याला पराजित करण्याचे आव्हान किती खडतर आहे, हे मुंबईने चेन्नईला दहा विकेटने हरवताना दाखवले. चेन्नईला पराजित करताना मुंबईने सुपर ओव्हरमधील पराभवातून आपण पूर्ण सावरल्याचेच दाखवले. उद्याची लढत मुंबईपेक्षा राजस्थानसाठी जास्त मोलाची आहे. ते सध्या सातवे आहेत. ही लढत गमावल्यास स्पर्धेतील आव्हान संपू शकेल. 

आता उद्याच्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार का, याचेही औत्सुक्‍य आहे. असेल. पोटरीच्या दुखापतीमुळे तो चेन्नईविरुद्ध खेळला नव्हता; पण त्याची अनुपस्थिती फारशी जाणवली नाही. रोहित न खेळल्यास पुन्हा क्विंटॉन डि कॉक आणि इशान किशन डावास सुरुवात करतील. सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, किएरॉन पोलार्ड, कृणाल पंड्याही चांगलेच बहरात आहेत. ट्रेट बोल्ट आणि जसप्रीत बुमराच्या स्पर्धेतील एकत्रित ३३ विकेट प्रतिस्पर्ध्यावर नक्कीच दडपण आणतील. 
स्टीव स्मिथचा सूर हरपलेला असताना प्रभावी मुंबई गोलंदाजीचा सामना करण्याचे आव्हान राजस्थानसमोर आहे. बेन स्टोक्‍स, संजू सॅमसन, जोस बटलर यांनी धावा केल्या आहेत; पण ते एकत्रित यशस्वी झाले नाहीत. जोफ्रा आर्चरला सहकारी गोलंदाजांची साथ आवश्‍यक 
आहे. 

धोनीसमोर विराट आव्हान
स्पर्धेतील आव्हान जवळपास संपलेले चेन्नई सुपर किंग्ज उद्या प्रतिष्ठा काहीशी कमावण्याचा प्रयत्न करतील. यात त्यांना यश आले, तर बंगळूरची गणिते बिघडू शकतात. तीनही सामने जिंकल्यासच चेन्नईच्या बाद फेरीच्या धूसर आशा कायम राहतील. चेन्नईच्या खराब कामगिरीनंतर धोनी नवोदितांना संधी देत नाही, अशी टीका झाली. मुंबईविरुद्ध संधी देण्यात आलेले ऋतुराज गायकवाड, नारायण जगदीशन या नवोदितांना भोपळाही फोडता आला नाही. 

संबंधित बातम्या