उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेसाठी नागपूरच्या मालविका बन्सोडला संधी

प्रतिनिधी
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

डेन्मार्कमधील उबेर करंडक बॅडमिंटन स्पर्धेसाठी संभाव्य भारतीय संघात निवड

नागपूर: येत्या ३ ते ११ ऑक्टोबरदरम्यान अरहस (डेन्मार्क) येथे होणाऱ्या महिलांच्या उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेसाठी नागपूरच्या मालविका बन्सोडची संभाव्य भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. 

पी. व्ही. सिंधूने आपला निर्णय बदलवून उबेर करंडक स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही मालविकाला अंतिम संघात स्थान मिळण्याची संधी आहे. 

२०२४ च्या ऑलिंपिकच्या दृष्टीने ही मालविकाची सुरुवात असेल. भारतीय बॅडमिंटन संघटनेने आगामी थॉमस व उबेर चषकांसाठी आयोजित सराव शिबिरासाठी २६ सदसीय संभाव्य संघांची घोषणा केली. भारतीय संघाचे तीन आठवड्यांचे सराव शिबिर हैदराबाद येथील पी. गोपीचंद अकादमीत आज, सोमवारपासून सुरू झाले आहे. शिबिरासाठी मालविका नुकतीच हैदराबाद येथे दाखल झाली आहे. कोरोनाची तपासणी व त्यानंतर शिबिरातील कामगिरीच्या आधारावर येत्या १७ सप्टेंबर रोजी भारतीय संघाची अंतिम निवड करण्यात येईल. डावखुऱ्या मालविकाची निवड झाल्यास उबेर चषकासाठी निवड होणारी ती नागपूरची तिसरी खेळाडू ठरेल. यापूर्वी २०१४ मध्ये अरुंधती पानतावणेची आणि २०१८ मध्ये वैष्णवी भालेची भारतीय संघात निवड झाली होती.

१८ वर्षीय मालविका सध्या भारतीय बॅडमिंटन क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. मालविकाची क्रमवारी व गेल्या काही महिन्यांतील शानदार कामगिरीमुळे तिची निवड पक्की मानली जात आहे. कोरोनाच्या संकटामुळे डेन्मार्कला प्रवास करण्याचा निर्णय स्वतः खेळाडूंना घ्यायचा असल्याचे भारतीय बॅडमिंटन संघटनेने म्हटले आहे. मालविकाने मात्र जाण्यास पसंती दर्शवली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने तब्बल सात महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. कोरोनामुळे जगभरातील स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. 

संजय मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या मालविकाने आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी बजावली आहे. 

शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या मालविकाने गतवर्षी मालदीव येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक, नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक, बहरीन येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ब्राँझपदक आणि नेपाळमधील २१ वर्षांखालील दक्षिण आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक गटात विजेतेपद मिळविले होते. तर फिलिपाइन्स येथील आशियाई बॅडमिंटन स्पर्धा व कॅनडा येथील वर्ल्ड ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेतही तिने देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय गोवा येथील अखिल भारतीय सिनियर बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक, कोझिकोडे येथील अ. भा. स्पर्धेत सुवर्णपदक, थिरूवनंतपुरम येथील अ. भा. ज्युनिअर मानांकन स्पर्धेत सुवर्णपदक आणि गुवाहाटी येथील अखिल भारतीय सिनियर नॅशनल सांघिक स्पर्धेतील विजेतेपदासह इतरही अनेक स्पर्धांमध्ये आपली छाप सोडली आहे.

संबंधित बातम्या