अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत नाओमी ओसाका उपांत्य फेरीत

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला ओसाकाची सर्व्हिस ब्रेक झाली होती, पण हा सामना तीच जिंकणार याची खात्री वाटत होती, हा सामना तिने ६०३, ६-४ असा जिंकला.

न्यूयॉर्क: चौथ्या मानांकित नाओमी ओसाकाने शेल्बे रॉजर्सचा सरळ सेटमध्ये पराभव करून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला विभागाची उपांत्य फेरी गाठली. अमेरिकेच्या रॉजर्सने सहाव्या मानांकित पेत्रा क्विटोवाचे चौथ्या फेरीत आव्हान संपुष्टात आणले होते, ओसाकासमोर मात्र ती फिकी पडली.

पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला ओसाकाची सर्व्हिस ब्रेक झाली होती, पण हा सामना तीच जिंकणार याची खात्री वाटत होती, हा सामना तिने ६०३, ६-४ असा जिंकला. उपांत्य सामन्यात तिची लढत २२ वर्षीय अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीविरुद्ध होईल. जेनिफरन आपल्या उपांत्यपूर्व सामन्यात कझाकस्तानच्या युलिया पुतिनत्सेवाचा ६-३, ६-२ असा पराभव केला.

या विजयाचा चांगला आनंद होत आहे, असे सामना संपल्यानंतर ओसाकाने मास्क लाऊन बोलताना सांगितले. गुणफलकावर कदाचित हा सामना किती चुरशीचा झाला हे कळणार नाही, परंतु काही रॅलीज चांगल्याच तुल्यबळ होत्या. काही क्षणी तिने माझ्या क्षमतेचा कस पाहिला,असे ओसाका म्हणाली.

महिलांमध्ये माजी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणाऱ्या ओसाकासाठी हा विजय मोलाचा होता, कारण या अगोदर रॉजर्सविरुद्ध झालेल्या तिन्ही लढतींत ती सरळ सेटमध्ये पराभूत झाली होती. यातील तिसरा आणि अखेरचा पराभव २०१७ मध्ये झाला होता. त्यानंतर ओसाकाने आपल्या खेळात कमालीची सुधारणा केलेली आहे.

२०१९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या ओसाकाने पहिल्या सेटमध्ये पहिल्या तीन सर्व्हिसवर केवळ दोन गुण गमावले, मात्र सहाव्या गेममध्ये तिने सर्व्हिस गमावली होती. त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिले नाही. गेल्या तीन सामन्यांतील पराभव माझ्या डोक्‍यातून जात नव्हता, त्यामुळे मी रॉजर्सला जराही संधी देत नव्हती. त्या पराभवाची परतफेड होती असेच मी म्हणेन, असे ओसाकाने सांगितले.

झ्वेरेवचीही आगेकूच
पुरुषांच्या गटात पाचव्या मानांकित जर्मनीच्या अलेक्‍झॅंडर झ्वेरेवने पहिल्या सेटमधील दारुण पिछाडीनंतर बोर्ना कॉरिसचा १-६, ७-६, ७-६ (७-१), ६-३ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. मी काहीसा अतिआक्रमक खेळ सुरुवातीला केला, परंतु अशी आक्रमकता ग्रॅंड स्लॅमच्या उपांत्यपूर्व सामन्यात अडचणीत आणू शकते याची जाणीव झाली आणि मी खेळात सुधारणा केली, असे झ्वेरेवने सांगितले.

झ्वेरेवचा उपांत्य फेरीत सामना स्पेनच्या २० व्या मानांकित पाब्लो कॅरेनो बुस्ताविरुद्ध होईल, त्याने १२ वे मानांकन असलेल्या डेनिस शापोलोवचे आव्हान ३-६ ७-६ (७-५) ७-६ (७-४) ०-६ ६-३, असे मोडून काढले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या