नरसिंग यादव शिबिरात, सुशील कुमारचा वैयक्तिक सराव

.
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

चार वर्षांपूर्वीच्या रिओ ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नरसिंग यादव आणि सुशील कुमार यांच्यात चांगलाच संघर्ष झाला होता.

मुंबई / नवी दिल्ली: चार वर्षांपूर्वीच्या रिओ ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नरसिंग यादव आणि सुशील कुमार यांच्यात चांगलाच संघर्ष झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती टोकियो ऑलिंपिकसाठी होण्याची चिन्हे दिसत आहेत. आता भारतीय कुस्ती महासंघाने ऑलिंपिक पूर्वतयारी शिबिरासाठी नरसिंगची निवड केली आहे, त्याचवेळी सुशील कुमारने वैयक्तिक सरावास पसंती दिली आहे. 

ऑलिंपिक पूर्वतयारीसाठी भारतीय कुस्तीगीरांचे सराव शिबिर सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्‍यता आहे. या शिबिरासाठी निवडलेल्या कुस्तीगीरांमध्ये नरसिंग यादवचा समावेश आहे. सुशीलने आपली निवड करू नका, आपण गुरू महाबली सत्पाल यांच्यासहच सराव करणार असल्याचे सांगितले आहे. 

चार वर्षांपूर्वी नरसिंगने ऑलिंपिकची पात्रता मिळवल्यावर सुशीलने ७४ किलो गटासाठी चाचणी घेण्याचा आग्रह धरला होता आणि प्रकरण न्यायालयात गेले होते. निकाल नरसिंगच्या बाजूने लागला, पण त्यानंतर काही दिवसांतच नरसिंग उत्तेजक चाचणीत दोषी ठरला. यासंदर्भात नरसिंगने भारतातील लढाई जिंकली, पण जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने त्याला खेळण्यास मनाई करत चार वर्षांची बंदी घातली.

संबंधित बातम्या