नाशिककर विदीतकडे भारतीय संघाचे नेतृत्त्व

Avit Bagle
मंगळवार, 14 जुलै 2020

"चेस ऑलिम्पियाड'मध्ये विश्‍वनाथन आनंदसह दिग्गज खेळाडूंचा समावेश

नाशिक

ऑल इंडिया चेस फेडरेशनतर्फे येत्या 22 जुलैला होणाऱ्या ऑनलाईन चेस ऑलिंम्पियाड 2020 या स्पर्धेत नाशिकचा विदीत गुजराथी भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार आहे. विशेष म्हणजे, बुद्धीबळ स्पर्धांमध्ये भारताला जगात नावलौकिक मिळवून देणारा माजी विश्‍वविजेता विश्‍वनाथन आनंद आणि अन्य दिग्गज बुद्धीबळपटूंचा समावेश या संघात असल्याने नाशिककरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
बुद्धीबळ म्हटले की सर्वप्रथम विश्‍वनाथन्‌ आनंदच आठवतो, एवढा त्याचा या क्षेत्रात दबदबा आहे. असे असतांनाही त्याचा समावेश असलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व नाशिकचा बुद्धिबळपटू व देशातील क्रमांक दोनचा ग्रॅंड मास्टर असलेल्या विदीतकडे देण्यात आले आहे. विदीतचे नामांकन केल्यानंतर ऑनलाइन चेस ऑलिंम्पियाड 2020 साठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून त्याची निवड करण्यात आली. यासंदर्भात विश्‍वनाथन आनंद आणि ऑल इंडिया चेस फेडरेशनचे अध्यक्ष पी. आर. व्यंकटरामा राजा यांच्यात झालेल्या चर्चेनंतर विदीतच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. भारतीय संघात विश्‍वनाथन्‌ आनंदसह पी. हरीक्रीष्णा आणि राष्ट्रीय चॅम्पियन अरविंद चिदंबरम्‌, वर्ल्ड रॅपीड चॅम्पियन कोनेरू हम्पी, डी. हरीका आदी दीग्गजांचा समावेश आहे. अशा संघाचे नेतृत्व विदीत करणार असल्याने ती नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे.

असा आहे भारतीय संघ
पुरूष : विश्‍वनाथन्‌ आनंद, विदीत गुजराथी (कप्तान), पी. हरीक्रीष्णा, अरविंध चिदंबरम्‌ (राखीव).
महिला : कोनेरू हम्पी, द्रोनावल्ली हरीका, भक्‍ती कुलकर्णी, आर. वैशाली (राखीव).
कनिष्ठ गट मुले : निहाल सरीन, आर. प्रज्ञानंदा (राखीव)
कनिष्ठ गट मुली : दिव्या देशमुख, वंतीका अग्रवाल (राखीव)

विदीत प्रचंड मेहनती असून, त्याच्यावर सोपविलेली जबाबदारी तो यशस्वीरित्या पार पाडेल असा विश्‍वास आहे. विश्‍वनाथन आनंदने विचारपूर्वक त्याचे नाव सूचविले असून, विदीतमधील क्षमता त्यानेही ओळखल्या आहेत. स्पर्धेच्या तयारीसाठी त्याने नियोजन आखले असून, चांगल्या कामगिरीची खात्री आहे.
-डॉ. निकीता गुजराथी, विदीतची आई.

संबंधित बातम्या