राष्ट्रीय स्पर्धा पुढील वर्षी टोकियो ऑलिंपिकनंतर?

Dainik Gomantak
शुक्रवार, 29 मे 2020

गोव्याने स्पर्धा बेमुदत लांबणीवर टाकल्यानंतर, साहजिकच पुढील साऱ्या प्रक्रियेत २०२० साल संपेल, असे गोवा ऑलिंपिक असोसिएशनच्या (जीओए) पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यातच राष्ट्रीय स्पर्धेसाठी काही खेळाच्या पात्रता स्पर्धा कोविड-१९, तसेच लॉकडाऊनमुळे होऊ शकलेल्या नाही.

पणजी 

गोवा सरकारने ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा देशव्यापी कोविड-१९ मुळे बेमुदत लांबणीवर टाकल्यानंतर, आता स्पर्धा नक्की कधी होणार याबाबत उत्सुकता आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेशी (आयओए) संबंधित पदाधिकाऱ्यांच्या मते, पुढील वर्षी टोकियो ऑलिंपिकनंतरच राज्यात स्पर्धेचा पडदा उघडू शकतो.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन समितीची पुढील बैठक सप्टेंबरअखेरीस होणार आहे. त्यावेळी देशातील कोरोना विषाणू महामारी प्रादुर्भावाच्या अनुषंगाने परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. सारे काही सुरळीत असल्यास, त्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाशी सल्लामसलत करून चार महिन्यांचा कालावधी राखत स्पर्धेच्या नव्या तारखा जाहीर कराव्या लागतील. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने हिरवा बावटा दाखविल्यानंतरच, स्पर्धेच्या नव्या तारखांची जुळवाजुळव केली जाईल. स्पर्धेच्या आयोजनाबाबत राज्य सरकार केंद्र सरकारचा सल्ला विचाराधीन घेईल, ही बाब गुरुवारच्या बैठकीनंतर क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांनी स्पष्ट केली आहे.
गोव्याने स्पर्धा बेमुदत लांबणीवर टाकल्यानंतर, साहजिकच पुढील साऱ्या प्रक्रियेत २०२० साल संपेल, असे गोवा ऑलिंपिक असोसिएशनच्या (जीओए) पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यातच राष्ट्रीय स्पर्धेसाठी काही खेळाच्या पात्रता स्पर्धा कोविड-१९, तसेच लॉकडाऊनमुळे होऊ शकलेल्या नाही. आयओए पर्यारी पात्रता निकषांचे अवलंब करण्याबाबत विचार करत आहे. राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचा अजून पूर्ण वेळ सराव सुरू झालेला नाही. पात्रतेसाठी त्यांना कालावधी लागेल, शिवाय पुढील वर्षीच्या ऑलिंपिकसाठीही तयारी करावी लागेल, असे या पदाधिकाऱ्याने नमूद केले.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत होईल. त्यामुळे या स्पर्धेपूर्वी राष्ट्रीय स्पर्धेला मुहूर्त मिळण्याची संधी खूपच अंधूक आहे, असे जीओएच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. ऑगस्ट २०२१ नंतरच गोव्यातील स्पर्धा घेतली जाईल. राज्यातील पावसाळा संपल्यानंतर पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच ३६व्या राष्ट्रीय स्पर्धा होऊ शकते. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी ऑलिंपिकसाठी पात्र भारतीय खेळाडूंना आणखी दमविण्यास आयओए तयार नसेल, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.
कोरोना विषाणू महामारीमुळे टोकियोत यंदा जुलै-ऑगस्टमध्ये होणारी ऑलिंपिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर टाकण्यात आली आहे. टोकियो ऑलिंपिकपूर्वी या वर्षी ठरल्यानुसार २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाल्यास भारतीय खेळाडूंना ऑलिंपिक तयारीची सुवर्णसंधी लाभेल, असे आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांना वाटत होते. यासंदर्भात त्यांनी एप्रिल महिन्याच्या प्रारंभी राष्ट्रीय क्रीडा महासंघास (एनएसएफ) लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते, पण आता तसे होणार नाही हे स्पष्टच आहे.

संबंधित बातम्या