चालढकल महागात पडली; गोव्याची संधी अखेर हुकलीच

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गुजरातमध्ये होणार
Indian National Championship
Indian National ChampionshipDainik Gomantak

पणजी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत गेली सात वर्षे सातत्याने चालढकल करणाऱ्या गोवा सरकारला जबर झटका बसला. आताही पावसाचे कारण देत स्पर्धा घेण्यास राज्याने असमर्थतता व्यक्त केली. त्यामुळेच भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) स्पर्धेचे यजमानपद गुजरातला बहाल केले.

या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये स्पर्धा घेण्यास गुजरात ऑलिंपिक संघटना आणि गुजरात सरकारने सज्ज असलेल्या आयओएला कळविले. त्यानुसार आयओए सचिव राजीव मेहता यांनी स्पर्धा गोव्याऐवजी गुजरातमध्ये होणार असल्याचे बुधवारी जाहीर केले.

प्राप्त माहितीनुसार, स्पर्धेचा उद्घाटन आणि समारोप सोहळा मोटेरा-अहमदाबाद येथील भव्यदिव्य नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. अहमदाबादव्यतिरिक्त राजकोट, सूरत, भावनगर, बडोदा येथे स्पर्धेचे आयोजन करण्यास गुजरात सरकारने तयारी दर्शविली असून केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) तांत्रिक अधिकारी सध्या गुजरातमध्ये आहेत.

प्रतिष्ठेची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा वेळेत आणि नियमितपणे घेण्याबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मदत करावी या आशयाचे पत्र आयओए राजीव मेहता यांनी केंद्रीय क्रीडा सचिवांना गेल्या 10 जूनच्या तारखेने पाठविले होते. देशातील क्रीडा क्षेत्राचा योग्य विकास आणि खेळाची वाढ या उद्देशाने राष्ट्रीय स्पर्धा दर दोन वर्षांनी घेण्याचे नियोजन असल्याचे मेहता यांनी पत्रात नमूद केले होते व गोव्याकडून स्पर्धा लांबणीवर टाकण्यात येत असल्याबद्दल चिंताही व्यक्त केली होती.

गोव्यात पुन्हा स्पर्धा होईल?

यासंदर्भात क्रीडा संचालक अजय गावडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी गुजरातमध्ये स्पर्धा होण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला, पण अजून अधिकृतपणे कळविण्यात आले नसल्याचे सांगितले. अजय गावडे म्हणाले, ‘‘पावसाळ्यामुळे सप्टेंबरच्या पूर्वार्धात स्पर्धा घेणे अजिबात शक्य नाही, तसेच काही बाकी कामांवर तयारीचा शेवटचा हात फिरवणेही बाकी आहे. ऑक्टोबरमध्ये गोव्यात 17 वर्षांखालील महिला फुटबॉल स्पर्धा होणार असल्याचे राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी मिळणार नाही. या बाबी आम्ही केंद्रीय क्रीडा मंत्रालयास कळविल्या आहेत. दुसरीकडे गुजरात सरकार स्पर्धा घेण्यास तयार आहे, त्यामुळे गोव्याला पुढील वेळेस स्पर्धेचे यजमानपद मिळू शकते. याशिवाय खेलो इंडिया यूथ गेम्सचे गोव्यास यजमानपद देण्याबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालय सकारात्मक आहे.’’

गोव्याला हवे होते आणखी पाच महिने

केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय स्पर्धा आयोजनाबाबत विचारणा केल्यानंतर, गोव्याने आयोजनासाठी आणखी पाच महिन्यांचा कालवधी आवश्यक असल्याचे कळविले. ‘‘भारतीय ऑलिंपिक संघटनेने सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्याबाबत विचारणा करणारे पत्र पाठविले आहे. सध्या पाऊस सुरू आहे, त्यामुळे पूर्ण सज्जतेसाठी आणखी वेळ आवश्यक आहे. नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत तयारी होईल. आणखी पाच ते सहा महिने आवश्यक आहे. सध्या तयार असलेल्या साधनसुविधांवर पुन्हा हात फिरवावा लागेल. मागील तीन-चार महिन्यांत कामाने वेग घेतला आहे. ऑक्टोबरमध्ये फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील सामने होणार आहे. या स्पर्धेची सर्व तयारी 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे साधनसुविधा तयारीचे एकंदरीत वेळापत्रक भरगच्च आहे,’’ असे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

Indian National Championship
निवडणुकीसाठी 12 सप्टेंबरपर्यंत वेळ द्या

गोव्याकडून स्पर्धा वारंवार लांबणीवर

गोव्याला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद 2008 साली बहाल करण्यात आले. नंतर 2015 साली केरळमध्ये 35वी स्पर्धा झाल्यानंतर गोव्यातील आयोजन निश्चित होते, पण राज्य सरकारने वेळोवेळी विविध कारणे देत स्पर्धा लांबणीवर टाकल्याचे आयओएला सलत आहे. ही बाब राजीव मेहता यांनी केंद्रीय क्रीडा सचिवांना पाठविलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केली आहे. 20 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2020 या कालवधीत स्पर्धा घेण्याचे निश्चित झाल्यानंतर मे 2020 मध्ये गोवा सरकारने कोविड महामारीचे कारण देत स्पर्धा बेमुदत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला होता.

टाईमलाईन सतत लांबलेल्या स्पर्धेचा...

- 2008 मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यजमान शहर करारपत्रावर गोवा सरकार व भारतीय ऑलिंपिक संघटना यांच्यात स्वाक्षरी

- गोव्यात 2011 साली 36 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्याचे नियोजन

- केरळमधील स्पर्धा 2015 साली, गोव्यातील स्पर्धा 2016 पर्यंत लांबणीवर

- नंतर 2017 मध्ये गोवा विधानसभेच्या निवडणुकीच्या कारणास्तव त्या वर्षी स्पर्धा घेण्यास गोव्याचा नकार

- 4 ते 17 नोव्हेंबर 2018 कालावधीत स्पर्धा घेण्याचे निश्चित, पण गोव्याची साधनसुविधा तयारीबाबत प्रगती असमाधानकारक व स्पर्धा लांबणीवर

- 30 मार्च ते 14 एप्रिल 2019 हा स्पर्धेचा नवा कालावधी, तरीही गोव्याची तयारी अपूर्ण, पण लोकसभा आणि राज्य विधानसभा पोटनिवडणुकीचे कारण देत स्पर्धा घेण्यास नकार

- 1 ते 16 नोव्हेंबर 2019 या कालावधीत स्पर्धा घेण्यास गोवा राजी, आयओएकडून मुदतवाढ, पण जुलैमध्ये राज्य सरकारचा स्पर्धा घेण्यास नकार व नव्या तारखांची मागणी

- 31 ऑगस्ट 2019 रोजी गोव्याला आणखी एक मुदतवाढ आणि 20 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2020 हा कालावधी निश्चित

- 28 मे 2020 रोजी कोविड-19च्या देशव्यापी प्रादुर्भामुळे स्पर्धा बेमुदत लांबणीवर टाकण्याचा गोवा सरकारचा निर्णय

- 29 जून 2022 रोजी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांच्याकडून गोव्याऐवजी गुजरातमध्ये स्पर्धा घेण्याचे जाहीर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com