राष्ट्रीय क्रीडादिनाचा मुहूर्त हुकला

क्रीडा प्रतिनिधी
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

कोरोना विषाणू महामारीचा दिलीप सरदेसाई पुरस्कारावर परिणाम

पणजी: ‘कोरोना विषाणू’मुळे गोव्यातील बाधित आणि मृतांची संख्या वाढत आहे. या महामारीमुळे  यंदा दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य पुरस्काराला राष्ट्रीय क्रीडादिनाचा (२९ ऑगस्ट) मुहूर्त चुकला आहे. 

गोव्यात जन्मलेले भारताचे महान कसोटी क्रिकेट फलंदाज दिलीप सरदेसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्य सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी नोंदविणाऱ्या गोमंतकीय क्रीडापटूचा क्रीडा नैपुण्य पुरस्काराने गौरव केला जातो. क्रीडा व युवा व्यवहार खात्यातर्फे क्रीडापटूची निवड करून पुरस्कार वितरण केले जाते.

पहिला पुरस्कार २००८-०९ सालासाठी देण्यात आला होता. यंदा कोविड-१९ मुळे राज्यात उद्‍भवलेल्या परिस्थितीच्या कारणास्तव पुरस्कार प्रक्रिया हाती घेण्यात आलेली नाही, अशी माहिती सूत्राने दिली.

गतवर्षी पुरस्कार निकष पूर्ण करणारे आंतरराष्ट्रीय क्रीडापटू नसल्यामुळे पुरस्काराचे वितरण झाले नव्हते. त्यापूर्वी २०१६-१७ सालासाठीही याच कारणास्तव पुरस्कार वितरण झाले नव्हते. राष्ट्रीय क्रीडा दिनी २९ ऑगस्ट रोजी पुरस्काराचे वितरण करण्यावर राज्य सरकारचा भर असतो. दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य पुरस्कार वितरण सोहळा शेवटच्या वेळेस २९ ऑगस्ट २०१८ रोजी झाला होता. पुरस्कारांतर्गत २ लाख रुपये, प्रशस्तिपत्रक आणि दिलीप सरदेसाई यांचा अर्धाकृती ब्राँझ पुतळा प्रदान करण्यात येतो.

संबंधित बातम्या