राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरणाचा आगळा-वेगळा सोहळा

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑगस्ट 2020

आभासी पद्धतीने राष्ट्रपती कोविंद यांच्याद्वारे खेळाडूंचा गौरव

नवी दिल्ली: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरणाच्या ४४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच आज आभासी पद्धतीने पुरस्कार विजेत्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यंदा पुरस्कार विजेत्यांची संख्या अधिक असल्यामुळे टीका करण्यात आली असली तरी क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी त्याचे समर्थन केले. 

हॉकी सम्राट ध्यानचंद यांच्या जयंती दिनी होणारा आणि कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर झालेला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा फारच वेगळा होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवनात, तर क्रीडा मंत्री किरेन रिजिजू आणि त्यांचे सहकारी विज्ञान भवनात उपस्थित होते, तसेच पुरस्कार विजेते खेळाडू त्यांच्या त्यांच्या शहरातून एकत्रितपणे क्रीडा प्रबोधिनीतून ऑनलाईन सहभागी झाले होते. 

रानी पीपीई किटमध्ये
एरवी राष्ट्रपती भवनात होत असलेल्या या पुरस्कार सोहळ्यात महिला खेळाडू साडी आणि ब्लेझर परिधान करून असतात, पण यंदा हॉकी कर्णधार रानी रामपाल बंगळूरहून पीपीई किट परिधान करून उपस्थित होती. भारतीय महिला हॉकी खेळाडूला प्रथम खेलरत्न पुरस्कार मिळाला, त्यामुळे रानीने समाधान व्यक्त केले. 
 
१४ जणांची अनुपस्थिती
खेलरत्न पुरस्कार मिळालेला रोहित शर्मा आयपीएलसाठी दुबईत गेलेला असल्यामुळे तो सहभागी झाला नाही, तर विनेश फोगट बॅडमिंटनपटू स्वास्तिक साईराज यांना कोरोना झाल्याचे निदान झाले, त्यामुळे त्यानेही पुरस्कार सोहळ्यापासून दूर रहाणे पसंत केले. एकूण १४ जण अनुपस्थित होते.

द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्याचे निधन
७४ पुरस्कार विजेत्यांच्या यादीत ७९ वर्षीय ॲथलेटिक्‍स प्रशिक्षक बंगळूरच्या पुरषोत्तम राय यांचा द्रोणाचार्य पुरस्कारांमध्ये समावेश होता, परंतु आज सकाळी पुरस्कार सोहळा सुरू होण्याच्या काही वेळ अगोदर त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. शुक्रवारी झालेल्या ड्रेस रियसलमध्ये ते सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या