Goa Sports: नव्या बुद्धिबळ कार्यकारी समितीकडे कार्यभार

गोवा बुद्धिबळ संघटना कार्यकारी समिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काही उमेदवारी अर्ज नाकारत 10 ऑगस्ट रोजी समिती बिनविरोध जाहीर केली होती.
नव्या बुद्धिबळ कार्यकारी समितीकडे कार्यभार
नव्या बुद्धिबळ कार्यकारी समितीकडे कार्यभारDainik Gomantak

पणजी: अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या नैतिकता आयोगाने दिलेला आदेश झुगारून गोवा बुद्धिबळ संघटनेच्या (Goa Chess Association) नव्या कार्यकारी समितीने 43 व्या वार्षिक आमसभेत कार्यभार स्वीकारला. त्यामुळे आता आयोगाच्या 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष असेल.

मावळते अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी संघटनेच्या प्रशासनाची सूत्रे रविवारी आमसभेत नवे अध्यक्ष राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्याकडे दिली. आमसभा वास्को येथे झाली. यावेळी बारा सदस्यीय कार्यकारी समितीत असलेल्या विरोधी गटातील पदाधिकाऱ्यांनी सभात्याग केला. सात तालुक्यांचा समावेश असलेला विरोधी गट आक्रमक असून महासंघाच्या नैतिकता आयोगाच्या 28 रोजीच्या सुनावणीनंतर पुढील धोरण ठरविणार असल्याचे तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर यांनी सांगितले. वेळप्रसंगी कायदेशीर मार्गाने जाण्याचे संकेतही त्यांनी दिले.

नव्या बुद्धिबळ कार्यकारी समितीकडे कार्यभार
नैतिकता आयोगाचा बुद्धिबळ संघटनेस दणका

गोवा बुद्धिबळ संघटना कार्यकारी समिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काही उमेदवारी अर्ज नाकारत 10 ऑगस्ट रोजी समिती बिनविरोध जाहीर केली होती. या प्रक्रियेस उमेदवार महेश कांदोळकर (तिसवाडी), आशेष केणी (सासष्टी तालुका), विश्वास पिळर्णकर (बार्देश तालुका) व अमोघ नमशीकर (फोंडा तालुका) यांनी आक्षेप घेत अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या नैतिकता आयोगाकडे तक्रार नोंदविली होती. आयोगाने 28 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली आहे व तोपर्यंत दस्तऐवज सादर करण्याचे बुद्धिबळ संघटनेस बजावले आहे, तसेच रविवारी होणाऱ्या संघटनेच्या आमसभेत निवडणूक निकाल जाहीर करू नये आणि कार्यभार सोपवू नये असेही आदेशात नमूद केले होते.

संघटनेचे पहिले अध्यक्ष डॉ. आर. व्ही. देव, माजी अध्यक्ष देविदास अस्नोडकर, माजी राज्य विजेता पुरुषोत्तम कंटक यांच्या निधनाबद्दल आमसभेने एक मिनिट शांतता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली. गतवेळच्या आमसभा कोविड-१९ महामारीमुळे ऑनलाईन झाली होती, त्या बैठकीचे इतिवृत्त मावळते सचिव किशोर बांदेकर यांनी सादर केले, तसेच समितीचा अहवाल व लेखापरिक्षित अंदाजपत्रक सादर केले. त्यास आमसभेने मान्यता दिली. निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष शिरोडकर यांनीही निवडणुकीचा अहवाल आमसभेस सादर केला. त्यात सारी प्रक्रिया 2017 मधील आमसभेने मंजूर केलेल्या ठरावानुसार असल्याचे नमूद केले.

नव्या बुद्धिबळ कार्यकारी समितीकडे कार्यभार
Goa Chess: निवडणुक प्रक्रियेत बुद्धिबळ महासंघाचा हस्तक्षेप?

सारी प्रक्रिया घटनेनुसार : काब्राल

बुद्धिबळ संघटनेची ४३वी आमसभा मावळते अध्यक्ष नीलेश काब्राल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. महेश कांदोळकर, आशेष केणी व अरविंद म्हामल यांनी निवडणूक प्रक्रियेस घेतलेले आक्षेप काब्राल यांनी फेटाळले. सारी प्रक्रिया 2017 साली संघटनेने घेतलेल्या ठरावानुसार झाल्याचे नमूद केले. कार्यकारी समितीत प्रत्येक तालुक्यास एक पद हा ठराव मंजूर झाला होता, त्यानुसारच निवडणूक झाली असून निकाल जाहीर करण्यात आले आहेत याकडे काब्राल यांनी लक्ष वेधले. गोवा बुद्धिबळ संघटनेच्या घटनेनुसार आमसभेच्या अध्यक्षांचा निर्णय अंतिम असल्याचे काब्राल यांनी सांगितले.

बुद्धिबळास शिखरावर नेण्याचे ध्येय : तेंडुलकर

गोवा बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदाची अधिकृतपणे सूत्रे स्वीकारल्यानंतर, सर्वांनी एकत्रितपणे आणखी मेहनत घेत गोव्यातील बुद्धिबळास शिखरावर नेण्याचे ध्येय बाळगावे असे आवाहन खासदार विनय तेंडुलकर यांनी केले. गोव्यातील बुद्धिबळास उंची गाठून दिल्याबद्दल त्यांनी मावळते अध्यक्ष काब्राल यांचेही आभार मानले.

बुद्धिबळ संघटनेची नवी कार्यकारी समिती (2021 ते 2025)

अध्यक्ष – विनय तेंडुलकर, सचिव – शरेंद्र नाईक, खजिनदार – किशोर बांदेकर, उपाध्यक्ष – सागर साकोर्डेकर, दामोदर जांबावलीकर, सत्यवान हरमलकर, अरविंद म्हामल, संयुक्त सचिव – समीर नाईक, तुकाराम शेट्ये, कालिदास हरवळकर, किशोर गावस देसाई, संयुक्त खजिनदार – रामचंद्र परब.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com