युवा गुणवत्तेवर नव्या मोसमात विश्वास

युवा गुणवत्तेवर नव्या मोसमात विश्वास
Players

पणजी

एफसी गोवा संघाने आगामी फुटबॉल मोसमासाठी डेव्हलपमेंट संघाचा कर्णधार लिअँडर डिकुन्हा याला करारबद्ध केले आहे, युवा गुणवत्तेवर विश्वास दाखविताना त्याच्या आणखी काही सहकाऱ्यांना सीनियर संघात संधी अपेक्षित आहे.
एफसी गोवाने कुंकळ्ळीच्या लिअँडरला सीनियर संघाची जर्सी प्रदान केली आहे. २२ वर्षीय लिअँडर बचावफळीत राईट बॅक जागी खेळतो. त्याच्याशी २०२३ पर्यंत करार करताना, डेव्हलपमेंट संघातून खेळताना केलेल्या लक्षवेधी कामगिरीची बक्षिसी देण्यात आली आहे. एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघातील आणखी युवा खेळाडूंना २०२०-२१ मोसमासाठी सीनियर संघात स्थान मिळू शकते.
गतमोसमात डेव्हलपमेंट संघातून खेळलेल्या सेरिनियो फर्नांडिस, फ्लॅन गोम्स, ॲरेन डिसिल्वा यांना सीनियर संघात बढती मिळण्याचे संकेत आहेत. याशिवाय ऐजॉलचा लालॉम्पुईया याचीही निवड शक्य आहे. यासंबंधी सूत्रांनी संकेत दिले आहेत. येत्या काही दिवसांत नव्या खेळाडूंच्या करारावर शिक्कामोर्तब होऊ शकते. सेरिनियो २१ वर्षांचा असून तो बचावफळीत खेळतो. १९ वर्षीय फ्लॅन व २२ वर्षीय ॲरेन आघाडीपटू आहेत, तर २८ वर्षीय लालॉम्पुईया गोलरक्षक आहे.
आगामी नव्या मोसमासाठी एफसी गोवा संघाने मेघालयाचा २५ वर्षीय विंगर रेडीम ट्लांग या नव्या खेळाडूस करारबद्ध केले असून अनुभवी स्पॅनिश मध्यरक्षक एदू बेदिया याचा करार वाढविला आहे. ३१ वर्षीय एदू २०२२ मोसअखेरपर्यंत एफसी गोवा संघात असेल आणि तो यंदा सलग चौथा मोसम खेळेल. एफसी गोवा संघ आगामी मोसमात नवे स्पॅनिश प्रशिक्षक ह्वआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळेल.
एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघातील सहा जण यापूर्वी सीनियर संघात आलेले आहेत. यामध्ये महंमद नवाज, सेवियर गामा, प्रिन्सटन रिबेलो, लिस्टन कुलासो, किंग्सली फर्नांडिस, शुभम धस यांचा समावेश आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com