सुर्यकिरणांमुळे १२व्या षटकातच थांबवावा लागला खेळ
न्यूझीलंडमधील नेपीयर येथील मॅक्लिन पार्क येथे सूर्यकिरणांमुळे खेळ थांबवण्याचा प्रकार पुन्हा घडला. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील ट्वेन्टी-२० सामन्यात १२ व्या षटकांत सूर्यकिरणांमुळे खेळात व्यत्यय आला.
नेपियर- पाऊस, अंधुक प्रकाश यामुळे क्रिकेट सामन्यात व्यत्यय येण्याच्या घटना अनेकदा घडतात, परंतु न्यूझीलंडमधील नेपीयर येथील मॅक्लिन पार्क येथे सूर्यकिरणांमुळे खेळ थांबवण्याचा प्रकार पुन्हा घडला. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील ट्वेन्टी-२० सामन्यात १२ व्या षटकांत सूर्यकिरणांमुळे खेळात व्यत्यय आला.
सूर्यास्त होत असताना मॅक्लिन पार्क येथे आंतरराष्ट्रीय सामन्याचा खेळ थांबवण्याचा प्रकार याअगोदरही घडला आहे. गतवर्षी भारत-न्यूझीलड एकदिवसीय सामना तब्बल अर्ध्या तासासाठी थांबवण्यात आला होता; तर २०१७ मध्ये न्यूझीलंड-बांगलादेश ट्वेन्टी-२० सामना सूर्यकिरणांनी रोखला होता. या स्टेडियमवर न्यूझीलंडमधील देशांतर्गत सामने होत असतात आणि त्यात अनेकदा व्यत्यय येत असतो.
पाकचा विजय
दरम्यान, या अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा चार विकेटने पराभव केला. न्यूझीलंडने ही मालिका २-१ अशी जिंकली.
कशामुळे होते अडचण?
साधारणतः खेळपट्टीची दिशा उत्तर-दक्षिण असते, परंतु मॅक्लिन पार्क येथील खेळपट्टीची दिशा पूर्व-पश्चिम असल्याने सूर्यास्त होत असताना सूर्यकिरणे थेट फलंदाजाच्या डोळ्यांत काही काळ जात असतात.