भारतीय फुटबॉलसाठी २०२० वर्ष डिलिट

.
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

यंदाच्या वर्षात एकही आंतरराष्ट्रीय सामना नाही, विश्वकरंडक पात्रता स्पर्धेतील सामने आता २०२१ मध्ये

मुंबई, ता. १२ ः कोरोनाच्या आक्रमणाचा भारतीय फुटबॉलला सर्वाधिक फटका बसला आहे. यंदाच्या म्हणजेच २०२० या वर्षांत भारताचा एकही आंतरराष्ट्रीय सामना होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. जागतिक फुटबॉल महासंघाने विश्वकरंडक पात्रता लढती लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतील आशिया विभागाच्या पात्रता लढती ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये घेण्याचे ठरले होते. या लढती लांबणीवर पडल्यामुळे अर्थातच आता भारतीय फुटबॉल सघाचे सराव शिबिरही लांबणीवर पडणार, हे निश्‍चित झाले आहे.

भारतीय फुटबॉल संघाचे शिबिर भुवनेश्वरला १५ ऑगस्टपासून घेण्याचा विचार होता. हे शिबिर प्रत्यक्षात १ सप्टेंबरपासून सुरू होणार होते; पण त्यापूर्वी खेळाडूंचे विलगीकरण होणार होते; पण भारतीय फुटबॉल महासंघाचे पदाधिकारी आंतरराष्ट्रीय लढती निश्‍चित झाल्यावरच शिबिराबाबत अंतिम निर्णय होईल, असे खाजगीत सांगत होते. त्याच वेळी पात्रता लढती अनिश्‍चित असल्याचे संकेत मिळत होते. अखेर आशियाई फुटबॉल महासंघाने याबाबतची अधिकृत घोषणा केली. कतारला २०२२ मध्ये होणाऱ्या विश्वकरंडक तसेच चीनमध्ये २०२३ ला होणाऱ्या आशिया कप फुटबॉल स्पर्धेच्या २०२० मध्ये होणाऱ्या पात्रता लढती २०२१ मध्ये होतील, असे आशियाई महासंघाने जाहीर केले. 

भारताच्या शिल्लक लढती

  •  भारताची ८ ऑक्‍टोबरला मायदेशात आशियाई विजेत्या कतारविरुद्ध लढत होती
  • भारतीय संघ १२ नोव्हेंबर २०२० ला बांगलादेशात; तर १७ नोव्हेंबर २०२०ला अफगाणिस्तानविरुद्ध मायदेशात खेळणार होता
  • भारतीय संघ पात्रता गटात चौथा
  • भारत यापूर्वीच्या लढतीत ओमानविरुद्ध मायदेशात १-२ पराभव, कतारला त्यांच्या देशात गोलशून्य रोखले, बांगलादेश आणि अफगाणिस्तानविरुद्ध १-१ बरोबरी; तर ओमानविरुद्ध हार

एका वर्षापेक्षा जास्तीचे लॉकडाऊन

  • भारत पहिली आंतरराष्ट्रीय फुटबॉल लढत किमान १३ महिन्यांनी खेळणार
  • भारताची यापूर्वीची अखेरची लढत १९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी ओमानविरुद्ध. 
  • मस्कतमधील या लढतीत भारताची ०-१ हार
  • भारतीय संघाची अखेरची मायदेशातील लढत १५ ऑक्‍टोबर २०१९ या दिवशी
  •  भारतास त्या वेळी बांगलादेश १-१ रोखले होते
  •  भारताच्या आंतरराष्ट्रीय लढतीस ९ ऑक्‍टोबरच्या कतारविरुद्धच्या लढतीने सुरुवात अपेक्षित होती; पण ही लढत २०२१ पर्यंत लांबणीवर

संबंधित बातम्या