'मुंबई सिटी'च्या अनुभवी खेळाडूंना नॉर्थईस्टचा ‘दे धक्का’

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

सामन्याच्या उत्तरार्धात क्वेसी अप्पिया याने केलेल्या पेनल्टी गोलमुळे नॉर्थईस्ट युनायटेडने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सनसनाटी विजयाची नोंद केली.

पणजी  : सामन्याच्या उत्तरार्धात क्वेसी अप्पिया याने केलेल्या पेनल्टी गोलमुळे नॉर्थईस्ट युनायटेडने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सनसनाटी विजयाची नोंद केली. गुवाहाटीच्या संघाने १० खेळाडूंसह खेळणाऱ्या मुंबई सिटी एफसीला १-० फरकाने हरविले. वास्को येथील टिळक मैदानावर शनिवारी झालेल्या या लढतीत अप्पियाने ४९व्या मिनिटास केलेला पेनल्टी गोल निर्णायक ठरला, तर ४३व्या मिनिटास हुकमी मध्यरक्षक अहमद जाहू याला थेट रेड कार्ड मिळाल्यामुळे मुंबई सिटीचा एक खेळाडू कमी झाला. नॉर्थईस्ट युनायटेडचा हा आयएसएल स्पर्धेत १४ लढतीनंतरचा पहिला विजय ठरला.

उत्तरार्धातील चौथ्या मिनिटास नॉर्थईस्ट युनायटेडने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. पेनल्टी फटक्यावर नॉर्थईस्ट युनायटेडचा आघाडीपटू क्वेसी अप्पिया याने गुवाहाटीच्या संघाचे खाते उघडले. शॉर्ट कॉर्नरवर डायलन फॉक्सचा हेडर मुंबई सिटीच्या रॉवलिन बॉर्जिसच्या हाताला लागला, हँडबॉलमुळे नॉर्थईस्टला सामन्यातील पहिला गोल नोंदविणे सोपे ठरले. इंग्लंडमध्ये जन्मलेल्या घानाच्या ३० वर्षीय आंतरराष्ट्रीय आघाडीपटूच्या कल्पक फटक्यासमोर मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग हतबल ठरला.

विश्रांतीला दोन मिनिटे बाकी असताना मुंबई सिटीस जोरदार झटका बसला. त्यांचा प्लेमेकर मध्यरक्षक अहमद जाहू याला रेड कार्ड मिळाले. मोरोक्कोच्या खेळाडूने नॉर्थईस्टच्या खास्सा कामारा याला धोकादायक टॅकल केले, त्यावेळी रेफरी आर. व्यंकटेश याने थेट रेड कार्ड दाखवून जाहूस मैदानाबाहेर काढले.

पूर्वार्धातील खेळावर मुंबई सिटीने वर्चस्व गाजविले, पण गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली. सर्जिओ लोबेरांच्या मार्गदर्शनाखालील संघाने संधी निर्माण केल्या, मात्र सदोष नेमबाजीमुळे चेंडू नेटच्या बाहेरच राहिला. आकडेवारीत पूर्वार्धात मुंबई सिटीचे तीनशेहून जास्त पास होते. सामन्याच्या २६व्या मिनिटास मुंबई सिटीस खूप लवकर संघात पहिला बदल करावा लागला. रेयनियर फर्नांडिसच्या पायाचा स्नायू दुखावल्यामुळे फारुख चौधरीस संधी मिळाली.

एका गोलच्या पिछाडीनंतर मुंबई सिटीने उत्तरार्धात बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले. आक्रमण धारदार करण्याच्या उद्देशाने लोबेरा यांनी ५८व्या मिनिटास गतमोसमात १५ गोल केलेल्या बार्थोलोमेव ओगबेचे याला बाहेर बोलावत जपानी खेळाडू सी गोडार्ड याला संघात सामावले. सामना संपण्यास चार मिनिटे असताना नॉर्थईस्ट युनायटेडच्या आशुतोष मेहता याने मुंबईच्या फारुख चौधरीस गोलक्षेत्राबाहेर पाडले. यावेळी मुंबईला फ्रीकिक मिळाली, पण त्याला लाभ उठवता आला नाही. रेफरींनी आशुतोषला यलो कार्ड दाखविले.

अधिक वाचा : 

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट ‘हाऊसफुल्ल’

जागतिक कसोटी अजिंक्‍यपद फायनल लॉर्डस् वर नाही ..?

एफसी गोवाचा आगामी मोसमासाठी इंडीन्यूजशी करार 

संबंधित बातम्या