आज नॉर्थईस्टसमोर केरळा ब्लास्टर्सचे खडतर आव्हान

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

 इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात नॉर्थईस्ट युनायटेडच्या मोहिमेस स्वप्नवत सुरवात झाली. आज बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर केरळा ब्लास्टर्सचे आणखी एक खडतर आव्हान गुवाहाटीच्या संघास पार करावे लागेल.

पणजी :  इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात नॉर्थईस्ट युनायटेडच्या मोहिमेस स्वप्नवत सुरवात झाली. आज बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर केरळा ब्लास्टर्सचे आणखी एक खडतर आव्हान गुवाहाटीच्या संघास पार करावे लागेल.

गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत फक्त दोन सामने जिंकलेल्या नॉर्थईस्ट युनायटेडने मागील लढतीत बलाढ्य मुंबई सिटीस 1-0 फरकाने चकीत केले. त्यांचा बचाव मुंबईच्या संघासाठी भारी ठरला. यंदाच्या आयएसएलमधील सर्वांत तरूण प्रशिक्षक 35 वर्षीय स्पॅनिश जेरार्ड नूस यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्टने अपेक्षा उंचावल्या आहेत. किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्सला अगोदरच्या लढतीत एटीके मोहन बागानकडून एका गोलने पराभूत व्हावे लागले. केरळा संघाच्या आघाडीपटूंना सूर गवसला नव्हता, त्यामुळे त्यांना एटीके मोहन बागानची आघाडी भेदता आली नव्हती.

मागील लढतीतील नॉर्थईस्ट युनायटेडचा प्रभावी बचाव पाहता, गुरुवारी केरळा ब्लास्टर्सच्या आक्रमकांना चांगलाच घाम गाळावा लागण्याची चिन्हे आहेत. मुंबई सिटीसारख्या मातब्बर संघाला नमविले तरीही नॉर्थईस्ट युनायटेडचे प्रशिक्षक नूस सावध आहेत. ‘‘केरळा ब्लास्टर्स हा आयएसएलमधील एक उत्कृष्ट संघ आहे. ते कितीतरी संधी तयार करू शकतात, त्यामुळे सामना अवघडच असेल. ते पराभूत होण्यास पात्र नाहीत. नक्कीच ते पुन्हा चांगले फुटबॉल खेळतील,’’ असे नूस सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाले.

मुंबई सिटीविरुद्धच्या नॉर्थईस्टच्या कामगिरीने केरळाचे प्रशिक्षक व्हिकुना यांना प्रभावित केले आहे. ‘‘मुंबई सिटीविरुद्ध ते खूपच चांगले खेळले आणि त्यांचा संघ दर्जेदार आहे. एक मात्र खरं, त्यांचा संघ मजबूत असून आमच्यासाठी खूपच खडतर आव्हान असेल,’’ असे व्हिकुना म्हणाले. पहिल्या सामन्यात पराभव झाला, तरीही व्हिकुना आशावादी आहेत. ‘‘आमच्याकडे बरेच नवे खेळाडू आहेत. त्यामुळे फुटबॉल संघ या नात्याने ओळख प्रस्थापित करण्यासाठी थोडा वेळ लागेल. मला वाटतं, की काही काळ लोटल्यानंतर आम्ही चांगले खेळू,’’ असे स्पॅनिश प्रशिक्षक म्हणाले.

 

दृष्टिक्षेपात...

- गतमोसमातील दोन्ही लढती बरोबरीत. कोची येथे 1-1, तर गुवाहाटी येथे गोलशून्य बरोबरी

- केरळा ब्लास्टर्सविरुद्ध नॉर्थईस्ट युनायटेड मागील 4 लढतीत अपराजित

- 23 नोव्हेंबर 2018 रोजी गुवाहाटी येथे नॉर्थईस्टचा 2-1 विजय, त्यानंतर सलग तीन बरोबरी

अधिक वाचा : 

पेनल्टी गोलमुळे मुंबई सिटी एफसीचा आयएसएलमधील पहिला विजय ; एफसी गोवावर 1-0  ने मात 

चेन्नईयीनच्या दोन गोलमुळे जमशेदपूरचा पडाव

संबंधित बातम्या