सिलाच्या गोलमुळे नॉर्थईस्टने केरळा ब्लास्टर्सला २-२ च्या बरोबरीत रोखले

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

निर्धारित नव्वद मिनिटांच्या खेळातील शेवटच्या मिनिटास गिनी देशाच्या इद्रिसा सिला याने नोंदविलेल्या शानदार गोलमुळे गुरुवारी नॉर्थईस्ट युनायटेडला दिलासा मिळाला. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल लढतीत त्यांनी पूर्वार्धातील दोन गोलांच्या पिछाडीवरून केरळा ब्लास्टर्सला २-२ गोलबरोबरीत रोखले.

पणजी : निर्धारित नव्वद मिनिटांच्या खेळातील शेवटच्या मिनिटास गिनी देशाच्या इद्रिसा सिला याने नोंदविलेल्या शानदार गोलमुळे गुरुवारी नॉर्थईस्ट युनायटेडला दिलासा मिळाला. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल लढतीत त्यांनी पूर्वार्धातील दोन गोलांच्या पिछाडीवरून केरळा ब्लास्टर्सला २-२ गोलबरोबरीत रोखले.

नॉर्थईस्ट युनायटेडचा पराभव टाळणारा गोल सुपर सब खेळाडू सिला याने ९०व्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सच्या दोघा बचावपटूंना नंतर गोलरक्षकालाही अप्रतिमपणे गुंगारा देत नोंदविला. प्रशिक्षक जेरार्ड नूस यांनी त्याला ७२व्या मिनिटास क्वेसी अप्पिया याच्या जागी बदली खेळाडू पाठविले होते. त्यापूर्वी गुवाहाटीतील संघाच्या अप्पिया याने पेनल्टी फटका वाया घालविला होता. सामना बांबोळी येथील जीएमसी मैदानावर झाला. नॉर्थईस्टचे आता दोन लढतीतून चार गुण झाले असून, केरळा ब्लास्टर्सने दुसऱ्या लढतीत एक गुण प्राप्त केला.

सामन्याच्या पूर्वार्धात दोन गोल नोंदवत केरळा ब्लास्टर्सने सामन्यावर पकड बसविली. पाचव्या मिनिटास स्पॅनिश कर्णधार सर्जिओ सिदोन्चा याचा हेडर निर्णायक ठरला, तर पूर्वार्धाच्या शेवटच्या मिनिटास इंग्लडचा आघाडीपटू गॅरी हूपर याने पेनल्टी फटका चुकविला नाही. ५१व्या मिनिटास घानाचा आंतरराष्ट्रीय क्वेसी अप्पिया याने नॉर्थईस्ट युनायटेडची पिछाडी एका गोलने कमी केली. मात्र ६६व्या मिनिटास तो पेनल्टी फटक्यास अचूक दिशा दाखवू शकला नाही. स्पॉटकिकवर फटका गोलपट्टीस आपटल्याने नॉर्थईस्टला बरोबरी साधता आली नाही.

किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्सची सुरवात आक्रमक होती. सामना सुरू झाल्यानंतर पाचव्याच मिनिटास सेटपिसवर त्यांना पहिले यश मिळाले. उजव्या बाजूतील फ्रीकिकवर सैत्यासेन सिंग याने सुरेख क्रॉसपास केला. यावेळी सिदोन्चा याने उंचावत हेडिंग साधले. यावेळी चेंडू गोलपोस्ट आपटून नेटमध्ये गेला. 

मॅराडोना यांना श्रद्धांजली
आयएसएल स्पर्धेत गुरुवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर केरळा ब्लास्टर्स व नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वी दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अर्जेंटिनाच्या या महान फुटबॉलपटूचे बुधवारी वयाच्या साठाव्या वर्षी निधन झाले होते. आयएसएलतर्फे या माजी जगज्जेत्यासाठी एक मिनिट शांतता पाळण्यात आली. 
 

संबंधित बातम्या