ISL 2020-21 : एटीके मोहन बागानसमोर नॉर्थईस्टचा धोका

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 5 मार्च 2021

नॉर्थईस्ट युनायटेड व एटीके मोहन बागान यांच्यातील प्ले-ऑफ फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामना शनिवारी (ता. 6) बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर होईल.

पणजी : खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट युनायटेडने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत स्वप्नवत घोडदौड राखली, त्यामुळे त्यांना स्पर्धेची उपांत्य (प्ले-ऑफ) फेरी गाठणे शक्य झाले. अपराजित मालिका कायम राखताना आता एटीके मोहन बागानच्या वाटचालीस धोका निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

नॉर्थईस्ट युनायटेड व एटीके मोहन बागान यांच्यातील प्ले-ऑफ फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामना शनिवारी (ता. 6) बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर होईल. खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील संघ स्पर्धेत सलग नऊ सामने अपराजित आहे. या कालावधीत त्यांनी 18 गोल केले आहेत. दुखापतीतून सावरलेला उरुग्वेचा फेडेरिको गालेगो  सज्ज झाल्याने नॉर्थईस्टची ताकद वाढली आहे. त्याने स्पर्धेत आतापर्यंत 4 गोल केले असून 6 असिस्ट नोंदविले आहेत. साखळी फेरीच्या गुणतक्त्यात नॉर्थईस्टने तिसरा क्रमांक मिळविला.

INDvsENG 4th Test : पहिल्या डावात रिषभ पंत ठरला पुन्हा तारणहार  

नॉर्थईस्ट युनायटेडने साखळी फेरीत एटीके मोहन बागानला पराभवाचा धक्का दिला होता, त्यामुळे अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघ सावध असेल. ``संघातील सर्व खेळाडूंनी खूप मेहनत घेतली. त्यांच्यामुळे आम्ही उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू शकलो. मी केवळ नऊ सामन्यांचा विचार केला नाही, तर सुरवातीपासूनचे नियोजन होते. खेळाडूंनी परिश्रम घेतले आणि त्यांचा प्रशिक्षक या नात्याने अभिमान वाटतो,`` असे नॉर्थईस्टचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक जमील यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले.

``नॉर्थईस्ट युनायटेडसाठी यंदाचा आयएसएल मोसम खूप चांगला ठरला. प्रतिस्पर्धी हा संघ खडतर आहे. त्यांच्या बचावफळीत आणि मध्यफळीत काही चांगले खेळाडू आहेत. त्यांचे सारे खेळाडू शंभर टक्के योगदान देतात,`` असे आपल्या प्रतिस्पर्धांचा आदर करताना एटीके मोहन बागानचे प्रशिक्षक हबास यांनी सांगितले.

एटीके मोहन बागाननेही स्पर्धेत सुरेख खेळ केला. या संघाने स्पर्धेत सर्वाधिक 10 क्लीन शीट्स राखल्या, पण साखळी फेरीतील अखेरच्या तीन लढतीत अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळे त्यांना लीग विनर्स शिल्डला मुकावे लागले. निर्णायक शेवटच्या साखळी लढतीत त्यांनी मुंबई सिटीकडून हार पत्करावी लागली. त्याची भरपाई करताना एटीके मोहन बागान संघ अंतिम फेरी गाठण्यासाठी इच्छुक असेल. 

 

दृष्टिक्षेपात...

- एटीके मोहन बागानच्या रॉय कृष्णा याचे स्पर्धेत सर्वाधिक 14 गोल

- साखळी फेरीत एटीके मोहन बागानचे 28, नॉर्थईस्ट युनायटेडचे 31 गोल

- स्पर्धेच्या साखळी फेरीतील पहिल्या टप्प्यात एटीके मोहन बागानचा नॉर्थईस्टवर 2-0 विजय

- दुसऱ्या टप्प्यात नॉर्थईस्ट युनायटेडची एटीके मोहन बागानवर 2-1 मात

- मागील 9 सामन्यांत नॉर्थईस्ट युनायटेडचे 6 विजय, 3 बरोबरी

- एटीके मोहन बागानच्या स्पर्धेत 10, तर नॉर्थईस्ट युनायटेडच्या 5 क्लीन शीट्स
 

संबंधित बातम्या