ISL 2020-21 : इंज्युरी टाईम पेनल्टी गोलमुळे सामना बरोबरीत राखत नॉर्थईस्टने आव्हान राखले

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये गोलरक्षक विशाल कैथ याची चूक चेन्नईयीन एफसीला चांगलीच महागात पडली.

पणजी : सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये गोलरक्षक विशाल कैथ याची चूक चेन्नईयीन एफसीला चांगलीच महागात पडली. त्यामुळे मिळालेल्या पेनल्टी फटक्यावर पोर्तुगीज आघाडीपटू लुईस माशादो याने अचूक लक्ष्य साधत सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील रोमहर्षक लढतीत नॉर्थईस्ट युनायटेडला 3 - 3 गोलबरोबरी साधून दिली. त्यामुळे गुवाहाटीच्या संघाच्या प्ले-ऑफ फेरीच्या आशाही कायम राहिल्या.

इंज्युरी टाईमच्या तिसऱ्या मिनिटास गोलक्षक कैथ याने पेनल्टी क्षेत्रात नॉर्थईस्टच्या इद्रिसा सिला याला पाडले. त्यामुळे रेफरी प्रांजल बॅनर्जी यांनी थेट पेनल्टी फटक्याची खूण केली. यंदाच्या मोसमात जोमदार फॉर्म असलेल्या माशादो याने लक्ष्य साधताना चूक केली नाही. कैथने चेंडू रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तो यशस्वी ठरला नाही. या गोलपूर्वी चेन्नईयीनने पूर्वार्धातील पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत आघाडी मिळविली होती. उत्तरार्धात एका मिनिटाच्या फरकाने दोन गोल केल्यामुळे चेन्नईच्या संघाची स्थिती बळकट झाली होती.

''आयपीएलच्या आगामी आवृत्तीत अर्जुन तेंडुलकरला स्वतःला सिद्ध करावे...

सामना गुरुवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. चेन्नईयीनसाठी 23 वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडू लाल्लियानझुआला छांगटे याने दोन गोल केले. त्याने अनुक्रमे 8 व 51 व्या मिनिटास गोल करून दोन वेळच्या माजी विजेत्यांची स्थिती भक्कम केली. चेन्नईयीनचा तिसरा गोल 37 वर्षीय स्पॅनिश मध्यरक्षक मान्युएल लान्झारोते याने 50 व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर नोंदविला. नॉर्थईस्टचे दोन्ही गोल पूर्वार्धातील खेळात झाले. 25 वर्षीय नवोदित खेळाडू इम्नान खान याने 14व्या, तर 30 वर्षीय जमैकन आघाडीपटू देशॉर्न ब्राऊन याने 43 व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल नोंदविला.

बरोबरीच्या एका गुणामुळे नॉर्थईस्ट युनायटेडचे 18 लढतीतून 27 गोल झाले. आता तिसऱ्या क्रमांकावरील हैदराबाद (+8), चौथ्या क्रमांकावरील एफसी गोवा (+7) यांचेही पाचव्या क्रमांकावरील नॉर्थईस्ट युनायटेड +3) यांच्याइतकेच गुण आहेत. चेन्नईयीनची ही दहावी बरोबरी ठरली. त्यांचे 19 लढतीनंतर 19 गुण झाले असून आठवा क्रमांक कायम आहे.

खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्टची अपराजित मालिका कायम राहिली. हा संघ आठ सामने आता अपराजित आहे.

दृष्टिक्षेपात...

- लाल्लियानझुआला छांगटे याचे यंदा 19 सामन्यांत 4 गोल, एकंदरीत 77 आयएसएल सामन्यांत 19 गोल

- मान्युएल लान्झारोते याचा यंदा 4 सामन्यांत 1 गोल, एकंदरीत 37 आयएसएल सामन्यांत 19 गोल

- देशॉर्न ब्राऊनचे नॉर्थईस्टतर्फे यंदा 5 गोल, आयएसएल स्पर्धेतील 24 सामन्यांत 8 गोल

- इम्रान खान याचा 4 लढतीत 1 गोल

- लुईस माशादो याचे 18 लढतीत 7 गोल

- नॉर्थईस्ट सलग 8 लढतीत अपराजित, 4 विजय, 4 बरोबरी

- चेन्नईयीन सलग 8 सामने विजयाविना, 5 बरोबरी, 3 पराभव
 

संबंधित बातम्या