ISL 2020-21 : नॉर्थईस्ट युनायटेड ईस्ट बंगालला नमवून गुणतक्त्यात चौथ्या स्थानी झेप

दैनिक गोमन्तक
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

सामन्याच्या उत्तरार्धात नोंदविलेल्या गोलच्या बळावर नॉर्थईस्ट युनायटेडने दमदार खेळाची मालिका कायम राखत दहा खेळाडूंसह खेळलेल्या ईस्ट बंगालला 2 - 1 फरकाने हरविले, त्यासह सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत प्ले-ऑफ फेरीच्या दिशेने कूच केली. ते आता चौथ्या स्थानी आले आहेत.

पणजी : सामन्याच्या उत्तरार्धात नोंदविलेल्या गोलच्या बळावर नॉर्थईस्ट युनायटेडने दमदार खेळाची मालिका कायम राखत दहा खेळाडूंसह खेळलेल्या ईस्ट बंगालला 2 - 1 फरकाने हरविले, त्यासह सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत प्ले-ऑफ फेरीच्या दिशेने कूच केली. ते आता चौथ्या स्थानी आले आहेत.

सामना मंगळवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. नॉर्थईस्ट युनायटेडसाठी व्ही. सुहेर याने 48 व्या मिनिटास पहिला गोल केला. नंतर 55व्या मिनिटास ईस्ट बंगालच्या सार्थक गोलुई याच्या स्वयंगोलमुळे नॉर्थईस्ट युनायटेडची आघाडी वाढली. सामन्याच्या 87 व्या मिनिटास  ईस्ट बंगालची पिछाडी सार्थक गोलुई यानेच एका गोलने कमी केली. त्यापूर्वी 71व्या मिनिटास राजू गायकवाड याला रेड कार्डमुळे मैदान सोडावे लागल्यामुळे बाकी 19 मिनिटे ईस्ट बंगालला दहा खेळाडूंसह खेळावे लागले.

नॉर्थईस्ट युनायटेडने अपराजित मालिका नवव्या सामन्यापर्यंत लांबविताना एकंदरीत सहावा विजय नोंदविला. खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे आता 30 गुण झाले असून गुणतक्त्यात एफसी गोवास गाठले आहे. गोलसरासरीत एफसी गोवा (+8) तिसऱ्या, तर नॉर्थईस्ट (+4) चौथ्या क्रमांकावर आहे. नॉर्थईस्टचा शेवटचा सामना शुक्रवारी केरळा ब्लास्टर्सविरुद्ध होईल. प्ले-ऑफ फेरीच्या दृष्टीने तो सामना गुवाहाटीच्या संघासाठी महत्त्वाचा असेल. ईस्ट बंगालला स्पर्धेतील आठव्या पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे 19 लढतीनंतर त्यांचे 17 गुण आणि नववा क्रमांक कायम राहिला.

I-League : चर्चिल ब्रदर्ससमोर `नेरोका`चे आव्हान

सामन्याच्या पूर्वार्धात ईस्ट बंगालने नॉर्थईस्ट युनायटेडला गोलशून्य बरोबरीत रोखले, पण उत्तरार्धात कोलकात्यातील संघाचा बचाव कोलमडला. त्यांच्याकडून चुका झाला व त्याचा लाभ गुवाहाटीच्या संघाने पुरेपूर उठविला. विश्रांतीनंतरच्या तिसऱ्याच मिनिटास व्ही. सुहेर याने नॉर्थईस्टचे गोलखाते उघडले. मैदानाच्या मध्यास इम्रान खान याला चेंडू मिळाला. या नवोदित खेळाडूकडून मिळालेल्या सुरेख पासवर सुहेर याने चेंडूला अचूक दिशा दाखविली. त्याचा हा आयएसएलमधील पहिलाच गोल ठरला.

विश्रांतीच्या दहा मिनिटानंतर नॉर्थईस्टला गोलची बक्षिसी मिळाली. नॉर्थईस्टच्या निम दोरजी याचा फटका विफल ठरविताना ईस्ट बंगालचा सार्थक गोलुई गडबडला आणि त्याने फटका आपल्यास नेटमध्ये मारला आणि स्वयंगोलमुळे नॉर्थईस्टची आघाडी वाढली. सामन्यातील 19 मिनिटांचा खेळ बाकी असताना ईस्ट बंगालचा एक खेळाडू कमी झाला. बचावपटू राजू गायकवाड याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले. नॉर्थईस्टच्या देशॉर्न ब्राऊनला चुकीच्या पद्धतीने आव्हान देणे गायकवाडच्या अंगलट आले.

दृष्टिक्षेपात...

- नॉर्थईस्ट युनायटेड सलग 9 सामने अपराजित, 5 विजय, 4 बरोबरी

- नॉर्थईस्टचे स्पर्धेत 29 गोल, त्यापैकी 17 गोल मागील 8 लढतीत

- नॉर्थईस्ट युनायटेडच्या व्ही. सुहेर याचा 16 लढतीत 1 गोल

- ईस्ट बंगालच्या सार्थक गोलुई याचा मोसमात 1 गोल, 48 आयएसएल सामन्यात 3 गोल

- नॉर्थईस्ट युनायटेडचे मोसमात ईस्ट बंगालवर सलग 2 विजय, पहिल्या टप्प्यात 2-0 फरकाने विजयी
 

संबंधित बातम्या