ISL 2020-21 : नॉर्थईस्ट युनायटेडने ओडिशाला सहजपणे नमवत गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी

दैनिक गोमन्तक
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

नॉर्थईस्ट युनायटेडने रविवारी धडाकेबाज खेळ करत ओडिशा एफसीला 3 - 1 फरकाने सहजपणे हरविले आणि सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानी प्रगती साधली.

पणजी : नॉर्थईस्ट युनायटेडने रविवारी धडाकेबाज खेळ करत ओडिशा एफसीला 3 - 1 फरकाने सहजपणे हरविले आणि सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानी प्रगती साधली. गुवाहाटीच्या संघाला सामन्यातील शेवटची चार मिनिटे दहा खेळाडूंसह खेळावे लागले.

सामना रविवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला. सामन्याच्या पहिल्या 24 मिनिटांत ओडिशावर तीन गोल डागत नॉर्थईस्टने सूत्रे हाती घेतली. पोर्तुगीज आघाडीपटू लुईस माशादो याने दोन गोल केले. त्याने अनुक्रमे नवव्या व 24व्या मिनिटास चेंडूला नेटची दिशा दाखविली. याशिवाय जमैकन स्ट्रायकर देशॉर्न ब्राऊन याने 19व्या मिनिटास अचूक नेम साधला. नॉर्थईस्टच्या विजयात उरुग्वेयन मध्यरक्षक फेडेरिको गालेगो याचे दोन असिस्टही निर्णायक ठरले. ओडिशाची पिछाडी 45+1व्या मिनिटास ऑस्ट्रेलियन ब्रॅड इनमॅन याने कमी केली. नॉर्थईस्टच्या गुरजिंदर कुमार याला 86व्या मिनिटास सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले.

अंतरिम मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट युनायटेडने अपराजित मालिका सात सामन्यांपर्यंत नेली. त्यांनी स्पर्धेतील एकंदरीत सहावा विजय नोंदविताना 17 सामन्यांतून 26 गुण प्राप्त केले. त्यामुळे प्रत्येकी 24 गुण असलेल्या एफसी गोवा आणि हैदराबाद एफसीला आता अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी घसरावे लागले आहे. ओडिशाचा हा स्पर्धेतील तब्बल दहावा पराभव ठरला. त्यांचे 17 लढतीनंतर नऊ गुण आणि शेवटचा अकरावा क्रमांक कायम राहिला.

ISL 2020-21 : आघाडी राखण्यासाठी मुंबई सिटीचे प्रयत्न

गुवाहाटीच्या संघाने सुरवातीपासून गोल धडाका राखत ओडिशाचा बचावाला तडे दिले. व्ही. सुहेर याच्याकडून चेंडू मिळाल्यानंतर आशुतोष मेहता याच्या क्रॉसपासवर माशादो याने ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याला पूर्णतः हतबल ठरविले. दहा मिनिटानंतर जमैकन देशॉर्न ब्राऊन याने ओडिशाच्या बचावातील त्रुटींचा लाभ उठविला. त्याने वेगाने धाव घेत उरुग्वेयन फेडेरिको गालेगो याच्या असिस्टवर गोलरक्षक अर्शदीपचा बचाव भेदत चेंडू नेटमध्ये घुसला. त्यानंतर पाच मिनिटांनी माशादोने आणखी एक गोल नोंदवत नॉर्थईस्टची स्थिती भक्कम केली. यावेळेसही गालेगो याचेच असिस्ट निर्णायक ठरले. माशादोचा ताकदवान हेडर रोखणे अर्शदीपला अजिबात शक्य झाले नाही.

पूर्वार्धातील इंज्युरी टाईममधील ऑस्ट्रेलियन ब्रॅड इनमॅन याने आयएसएलमधील पहिला गोल नोंदवत ओडिशाची पिछाडी एका गोलने कमी केली. डॅनियल लाल्हलीम्पुईया याच्या असिस्टवर त्याने हा गोल केला. ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप याने पूर्वार्धातील कामगिरीत सुधारणा केल्यामुळे 63व्या मिनिटास माशादो याला यंदाच्या आयएसएलमधील पहिली हॅटट्रिक नोंदविणे शक्य झाले नाही.

दृष्टिक्षेपात...

-नॉर्थईस्ट युनायटेडचा पोर्तुगीज आघाडीपटू लुईस माशादोचे 17 सामन्यात 6 गोल

- नॉर्थईस्टतर्फे जमैकन देशॉर्न ब्राऊनचे 4 गोल, एकंदरीत 23 आयएसएल सामन्यात 7 गोल

- ओडिशाच्या ब्रॅड इनमॅनचा 9 सामन्यांत 1 गोल

- नॉर्थईस्टचा उरुग्वेयन मध्यरक्षक फेडेरिको गालेगोचे 13 सामन्यात 6 असिस्ट

- नॉर्थईस्ट युनायटेड सलग 7 सामने अपराजित, 4 विजय, 3 बरोबरी

- ओडिशा एफसी सलग 8 सामने विजयाविना, 4 बरोबरी, 4 पराभव

- ओडिशावर सर्वाधिक 10 पराभवांची नामुष्की, तसेच त्यांच्यावर सर्वाधिक 30 गोल

संबंधित बातम्या