पणजी : पूर्वार्धातील स्वयंगोलनंतर इंज्युरी टाईममध्ये आणखी एक गोल स्वीकारल्यामुळे ईस्ट बंगालला इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखताना गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेडने 2-0 फरकाने बाजी मारली.
सामना वास्को येथील टिळक मैदानावर झाला. ईस्ट बंगालच्या सूरचंद्र सिंग याने 33व्या मिनिटास चेंडू स्वतःच्या संघाच्या नेटमध्ये मारण्याची चूक केली. नंतर इंज्युरी टाईमच्या पहिल्याच मिनिटास बदली खेळाडू 22 वर्षीय मध्यरक्षक रोचार्झेला याने गुवाहाटीतील संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने आणखी एक बदली खेळाडू सुहेर याच्या असिस्टवर गोलक्षेत्रात सुरेख फटका साधताना प्रतिस्पर्धी गोलरक्षक देबजित मजुमदार याचा चकवा दिला.
स्पॅनिश जेरार्ड नूस यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट युनायटेडचा हा चार लढतीतील दुसरा विजय ठरला. अन्य दोन बरोबरीमुळे त्यांचे आठ गुण झाले असून त्यांना एटीके मोहन बागाननंतर आता दुसरा क्रमांक मिळाला आहे. ओळीने तिसरा पराभव पत्करल्यामुळे ईस्ट बंगालला गुणतक्त्यात खाते उघडण्यासाठी तिष्ठत राहावे लागले.
पूर्वार्धातील खेळात ईस्ट बंगाल संघ कमनशिबीच ठरला. विसाव्या मिनिटास त्यांना पेनल्टी फटका नाकारला गेला, तर नंतर त्यांच्या बचावपटूच्या चुकीमुळे नॉर्थईस्ट युनायटेडला आघाडी संपादन करता आली. त्यामुळे रॉबी फावलर यांची निराशा आणखीनच वाढली.
ईस्ट बंगालने विसाव्या मिनिटास पेनल्टी फटक्याचा दावा केला होता. नारायण दासच्या पासवर जॅक मघोमा याने नॉर्थईस्टच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारली होती. यावेळी त्याला गोलक्षेत्रात आशुतोष मेहता याने पाडले. मात्र रेफरी यांनी संतोष कुमार यांनी ईस्ट बंगालच्या खेळाडूंचे अपील मान्य केले नाही.
नॉर्थईस्ट संघ 33व्या मिनिटास नशिबवान ठरला. इद्रिसा सिला आणि क्वेसी अप्पिया यांनी संयुक्तपणे रचलेल्या चालीवर ईस्ट बंगालचा बचाव तणावाखाली आला. अप्पियाच्या क्रॉसपासवर सिला याने गोलक्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला. तो चेंडूवर नियंत्रण राखण्याच्या प्रयत्नात असताना ईस्ट बंगालच्या सूरचंद्रला आपटून चेंडून नेटमध्ये गेला. रिप्लेमध्ये ईस्ट बंगालच्या खेळाडूने स्वयंगोल केल्याचे सिद्ध झाले.
दृष्टिक्षेपात...
- ईस्ट बंगालच्या सूरचंद्र सिंग याचा स्वयंगोल यंदाच्या आयएसएलमधील पहिलाच
- आयएसएल स्पर्धेत नॉर्थईस्ट युनायटेडचे आता 100 गोल
- नॉर्थईस्ट युनायटेडचे यंदाच्या स्पर्धेत 6 गोल
- ईस्ट बंगालने स्पर्धेत 7 गोल स्वीकारलेत