अपराजित नॉर्थईस्ट युनायटेडने एफसी गोवाला 1-1 फरकाने रोखले; एफसी गोवा अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

एफसी गोवा संघ पुन्हा एकदा इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात विजयापासून दूर राहिला. काल त्यांना गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेडने 1-1 असे गोलबरोबरीत रोखले.

पणजी  : एफसी गोवा संघ पुन्हा एकदा इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात विजयापासून दूर राहिला. काल त्यांना गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेडने 1-1 असे गोलबरोबरीत रोखले.

सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. पूर्वार्धात नॉर्थईस्ट युनायटेडसाठी इद्रिसा सिला याने पेनल्टीवर 40व्या मिनिटास गोल केल्यानंतर 43व्या मिनिटास इगोर आंगुलो याने यजमान संघास बरोबरी साधून दिली.

उत्तरार्धात संधी वाया गेल्या नसत्या, तर एफसी गोवास स्पर्धेतील पहिला विजय नोंदविता आला असता. त्यांची ही तीन लढतीतील दुसरी बरोबरी ठरली. त्यामुळे दोन गुण झाले आहेत. त्यांना सातवा क्रमांक मिळाला आहे. नॉर्थईस्ट युनायटेड आता तीन लढतीत अपराजित आहे. दोन बरोबरी व एका विजयामुळे त्यांचे पाच गुण झाले आहेत. ते आता एटीके मोहन बागाननंतर (६ गुण) दुसऱ्या स्थानी आहेत.

पूर्वार्धात तीन मिनिटांत दोन गोल झाल्याने गोलबरोबरीची कोंडी कायम राहिली. गिनी देशाच्या इद्रिसा सिला याने रिटेक पेनल्टी अचूक मारल्यानंतर नॉर्थईस्टच्या खाती आघाडी जमा झाली, पण गुवाहाटीच्या संघाचा आनंद जास्त काळ टिकला नाही. ब्रँडन फर्नांडिसने डाव्या बाजूने दिलेल्या शानदार असिस्टवर स्पॅनिश इगोर आंगुलो याने एफसी गोवास 1-1 अशी बरोबरी साधून दिली.

एफसी गोवाचा स्पॅनिश बचावपटू इव्हान गोन्झालेझ याने गोलक्षेत्रात सिला याला मागून ओढत पाडले. यावेळी रेफरी क्रिस्टल जॉन यांनी नॉर्थईस्टला पेनल्टी फटका दिला. मागील लढतीत केरळा ब्लास्टर्सविरुद्ध संघासाठी बरोबरीचा गोल केलेल्या सिला याने गोलरक्षक महंमद नवाझ चकविले होते, पण पेनल्टी फटका मारण्यापूर्वी लालरेमपुईया फनाल याने धाव घेतल्यामुळे रेफरींनी पुन्हा पेनल्टी फटका मारण्यास सांगितले. यावेळी सिला याने पुन्हा नवाझ याचा बचाव भेदत संघाची आघाडी निश्चित केली. त्यापूर्वी, 34व्या मिनिटास सिला हेडर दिशाहीन ठरल्यामुळे गुवाहाटीच्या संघास आघाडी घेता आली नव्हती.

विश्रांतीस दोन मिनिटे बाकी असताना आंगुलो याने ब्रँडनच्या पासचे सोने करत यजमान संघाची पिछाडी भरून काढली. प्रथमच संघात स्टार्ट मिळालेल्या ब्रँडनने त्याच्या पहारा ठेवलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूस गुंगारा देत चेंडू आंगुलोच्या ताब्यात दिला. यावेळी 36 वर्षीय स्ट्रायकर अलगद फटक्यावर गोलरक्षक सुभाशिष रॉय चौधरीस चकविले. विश्रांतीला गोलरक्षक सुभाशिषची जागा गुरमीत सिंग याने घेतली.

उत्तरार्ध खेळ सुरू झाल्यानंतर तिसऱ्याच मिनिटास आंगुलो याला एफसी गोवास आघाडी मिळवून दिल्याची संधी होती, पण त्याचा हेडर दिशाहीन ठरला. सामना संपण्यास सहा मिनिटे बाकी असताना आल्बर्टो नोगेरा याचा फटका उजव्या गोलपोस्टला आपटल्यामुळे एफसी गोवा संघ पुन्हा एकदा आघाडीपासून दूर राहिला.

 

दृष्टिक्षेपात...

- इगोर आंगुलो याचे आता यंदाच्या आयएसएल स्पर्धेत 3 गोल, जमशेदपूरच्या नेरियूस व्हॅल्सकिसला गाठले

- इद्रिसा सिला याचे आयएसएल स्पर्धेत 2 गोल, सलग दुसऱ्या लढतीत गोल

- नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध सलग 6 सामने एफसी गोवा अपराजित

- गुवाहाटीच्या संघाविरुद्ध 6 लढतीत एफसी गोवाच्या 3 बरोबरी, 3 विजय

- आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचा एकूण 24 बरोबरी

- सामन्यात एफसी गोवाचे 579, तर नॉर्थईस्ट युनायटेडचे 206 पास

 
 

संबंधित बातम्या