नॉर्थईस्ट युनायटेडची आत्मविश्वास उंचावलेल्या हैदराबादशी गाठ

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 7 जानेवारी 2021

नॉर्थईस्ट युनायटेड, तसेच हैदराबाद एफसी संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात सातत्य राखू शकलेला नाही.

पणजी: नॉर्थईस्ट युनायटेड, तसेच हैदराबाद एफसी संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात सातत्य राखू शकलेला नाही. शुक्रवारी (ता. 8) एकमेकांविरुद्ध उभे ठाकताना कामगिरी उंचावणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असेल.

वास्को येथील टिळक मैदानावर नॉर्थईस्ट युनायटेड व हैदराबाद यांच्यात सामना होईल. मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबादने मागील लढतीत चेन्नईयीन एफसीचा 4-1 फरकाने धुव्वा उडविला. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. जेरार्ड नूस यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट युनायटेड संघाने स्पर्धेतील मोहिमेची सुरवात धडाकेबाज विजयाने केली. मात्र मागील पाच लढतीतून त्यांना फक्त तीन गुण मिळाले आहेत. शिवाय दोन लढतीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे हैदराबादविरुद्ध पूर्ण तीन गुण प्राप्त करून गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी गुवाहाटीचा संघ प्रयत्नशील असेल. मागील लढतीत त्यांना एटीके मोहन बागानकडून दोन गोलनी पराभव पत्करावा लागला.

प्रत्येकी नऊ सामने खेळल्यानंतर हैदराबाद व नॉर्थईस्ट यांच्यात सध्या फक्त एका गुणाचा फरक आहे. हैदराबादचे 12, तर नॉर्थईस्ट युनायटेडचे 11 गुण आहेत. हैदराबादने ओळीने तीन सामने गमावल्यानंतर चेन्नईयीनविरुद्ध स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची नोंद केली. त्यात मध्यरक्षक हालीचरण नरझारी याची कामगिरी निर्णायक ठरली. या मध्यरक्षकाने सामन्यात दोन गोल केले. याशिवाय ऑस्ट्रेलियन जोएल चियानेज यानेही यशस्वी पुनरागमन केले. अरिदाने सांतानाही फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे नॉर्थईस्टच्या बचावफळीस शुक्रवारी सावध राहावे लागेल.

आणखी वाचा: 

INDvsAUS पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 166 धावा..रिषभ पंतकडून दोन मोठ्या चुका -

 

 

दृष्टिक्षेपात...

  • - यंदाच्या स्पर्धेत हैदराबादचे 11, तर नॉर्थईस्ट युनायटेडचे 10 गोल
  • - नॉर्थईस्ट युनायटेडच्या 9 लढतीत 5 बरोबरी
  • - हैदराबादच्या आरिदाने सांतानाचे 5 गोल
  • - नॉर्थईस्टच्या 3, तर हैदराबादच्या 2 क्लीन शीट
  • - गतमोसमात हैदराबाद येथे नॉर्थईस्ट 1-0, तर गुवाहाटी येथे हैदराबाद 5-1 फरकाने विजयी
     

संबंधित बातम्या