ISL 2020-21 : मुंबई सिटीचा बुमूस अडचणीत; सामना अधिकाऱ्यांशी अयोग्य वर्तनप्रकरणी नोटीस

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

मुंबई सिटीचा मोरोक्कन मध्यरक्षक ह्यूगो बुमूस अडचणीत आला आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामन्यातील अधिकाऱ्यांशी  अयोग्य वर्तन केल्याप्रकरणी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) शिस्तपालन समितीने त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पणजी : मुंबई सिटीचा मोरोक्कन मध्यरक्षक ह्यूगो बुमूस अडचणीत आला आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामन्यातील अधिकाऱ्यांशी  अयोग्य वर्तन केल्याप्रकरणी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) शिस्तपालन समितीने त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर गेल्या सोमवारी (ता. 8) एफसी गोवाविरुद्धच्या सामन्यात मुंबई सिटीच्या बुमूसला इंज्युरी टाईममधील पाचव्या मिनिटास यलो कार्ड दाखविण्यात आले होते. खेळात वेळकाढू धोरणामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. एकंदरीत त्याचे हे मोसमातील चौथे यलो कार्ड ठरले. त्यानंतर सामनाधिकाऱ्यांना आक्षेपार्ह आणि अपमानजनक भाषा वापरल्यामुळे बुमूस याला थेट रेड कार्ड दाखविण्यात आले होते.

INDvsING: "भारत इंग्लंड कसोटी मालिकेला तेंडुलकर आणि या खेळाडूचं नाव द्या...

स्पर्धेच्या नियमानुसार मोसमातील चार यलो कार्ड आणि थेट हकालपट्टी या कारणास्तव बुमूसला दोन सामन्यांच्या निलंबनास सामोरे जावे लागणार आहेत. त्यामुळे तो मुंबई सिटीच्या बंगळूर एफसी व जमशेदपूर एफसी या संघाविरुद्धच्या पुढील सामन्यांत अपात्र असेल. याशिवाय सामना रेफरीच्या अहवालाच्या विश्लेषणानंतर, अतिरिक्त निर्बंध का लादू नयेत अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस समितीने बुमूसला बजावली आहे. उत्तर देण्यासाठी बुमूसला शुक्रवारी (ता. 12) सकाळी नऊ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

एफसी गोवाच्या ईशान पंडिता याने इंज्युरी टाईममध्ये केलेल्या गोलमुळे सामना 3-3 गोलबरोबरीत राहिला होता. 25 वर्षीय बुमूस मुंबई सिटीतर्फे मोसमात 13 सामने खेळला असून दोन गोल व सात असिस्ट अशी त्याची कामगिरी आहे. यापूर्वी तीन मोसम तो एफसी गोवा संघातर्फे आयएसएल स्पर्धेत खेळला होता. सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटी संघ सध्या 16 लढतीनंतर 34 गुणांसह अग्रस्थानी असून प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरला आहे.

 

 

संबंधित बातम्या