यूएस ओपन: नोवाक जोकोविचची स्पर्धेतून हकालपट्टी

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

रागाने मारलेला चेंडू लाईन जजच्या कंठाला लागला

न्यूयॉर्क: टेनिस सुपरस्टार नोवाक जोकोविचने अनवधानाने; पण रागाने विनाकारण मारलेला चेंडू लाईन जजच्या कंठाला लागला. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे तिचा जीव कंठाशी आला होता. या आतताई कृतीमुळे जोकोविचची अमेरिकन स्पर्धेत चौथ्या फेरीतून हकालपट्टी करण्यात आली. 

१८ व्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या जोकोविचने स्वतःच्याच हाताने २९ सामन्यांची विजयी मालिका खंडित केली. अव्वल मानांकित असलेल्या जोकोविचचा पाब्लो कॅरी ओ बुस्टाविरुद्ध सामना होता. पहिल्या सेटमध्ये सर्व्हिस गमावलेला जोकोविच ५-६ पिछाडीवर होता.  लय सापडत नाही, हे समजताच जोकोविचचा संयम सुटू लागला होता. 

जोकोविचकडे चेंडू मारण्यात आला. त्याने तो रागाने पाठीमागे जोरात मारला. त्या वेळी गुडघ्यावर हात ठेऊन असलेल्या लाईन जजच्या बरोबर कंठावर तो लागला. अचानक आघात झाल्यामुळे लाईन जज तेथेच खाली पडल्या. 

अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनीच लाईन जज यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर १० मिनिटे खल सुरू होता. स्पर्धेचे मुख्य रेफ्री सोरेन फ्रिमेल, ग्रॅंड स्लॅम निरीक्षक अँड्रिस इग्ली आणि चेअर अंपायर औरिली टॉर्टे यांच्यासमोर जोकोविच आपली बाजू मांडत होता; पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्याला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 

तिसरा खेळाडू
सामन्यातून किंवा स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आलेला जोकोवच तिसरा खेळाडू ठरला आहे. २०१७ मध्ये ब्रिटनविरुद्धच्या डेव्हिस करंडक सामन्यात कॅनडाच्या डेनिस शापोलोवने अनवधानाने चेअर पंचांच्या तोंडावर चेंडू मारला होता. त्याअगोदर १९९५ च्या विम्बल्डन स्पर्धेत टीन हेन्मनने बॉलगर्लच्या डोक्‍यावर चेंडू मारला होता.

संबंधित बातम्या