संख्या वाढली, पण गोव्यातील एकच संघ

क्रीडा प्रतिनिधी
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत चर्चिल ब्रदर्सकडून राज्याचे प्रतिनिधित्व 

पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अखिल भारतीय भारतीय फुटबॉल महासंघाने नव्या संघांना संधी दिली आहे, त्यामुळे सहभागी संघांची संख्या वाढली आहे, पण या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत चर्चिल ब्रदर्स हा गोव्यातील एकच संघ आहे.

दिल्लीच्या सुदेवा एफसी संघाला आगामी (२०२०-२१) मोसमात, तर विशाखापट्टणमच्या श्रीनिधी एफसीला २०२१-२२ मोसमापासून आ य-लीग स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. २०१९-२० मोसमातील आय-लीग स्पर्धेत ११ संघ खेळले होते, मात्र विजेत्या मोहन बागान संघाचे एटीके संघात विलिनीकरण झाल्यानंतर कोलकात्याच्या या संघाचे आता इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत प्रतिनिधित्व असेल. आगामी आय-लीग स्पर्धेत सुदेवा एफसी अकरावा संघ ठरला आहे, तर द्वितीय विभागातून पात्र ठरणारा संघ बारावा असेल. स्पर्धेच्या तेरा मोसमात ३२ वेगवेगळे संघ खेळले आहेत. सुदेवा एफसी ३३वा, तर श्रीनिधी एफसी ३४ संघ ठरेल.

यंदाची आय-लीग स्पर्धेत कोरोना विषाणू महामारीमुळे वर्षअखेरीस कोलकाता येथील रिकाम्या स्टेडियमवर होण्याचे संकेत आहेत. त्यापूर्वी द्वितीय विभागीय स्पर्धा होईल. गतमोसमातील आय-लीग स्पर्धा अर्धवट राहिल्यामुळे संघाची पदावनती झालेली नाही. सुदेवा एफसी व द्वितीय विभागीय विजेता संघ मिळून आय-लीग स्पर्धा १२ संघांची असेल, असे महासंघाचे उपाध्यक्ष सुब्रत दत्ता यांनी स्पष्ट केले आहे. 

गोव्याचे संघ घटले
राष्ट्रीय साखळी स्पर्धा २००७-०८ मोसमापासून आय-लीग नावाने खेळली जाऊ लागली. तेव्हापासून २०१४-१५ पर्यंत गोव्याच्या संघांचा वरचष्मा राहिला. सहा मोसमात गोव्यातील चार संघ एकावेळेस स्पर्धेत खेळले आहेत, त्यामुळे सर्वाधिक सामने गोव्यात होत असत आणि राज्य फुटबॉलसाठी देशातील मुख्य केंद्र ठरले होते. २००७-०८ ते २०१२-१३ असे सलग सहा मोसम गोव्यातील संघच या स्पर्धेत विजेते ठरले होते. आय-लीग स्पर्धेबाबत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची धोरणे न पटल्यामुळे २०१६-१७ पासून गोव्यातील धेंपो स्पोर्टस क्लब, स्पोर्टिंग क्लब द गोवा आणि साळगावकर एफसी या संघांनी आय-लीगमधून माघार घेतली. तेव्हापासून चार मोसम फक्त चर्चिल ब्रदर्स हाच गोव्यातील संघ आय-लीगमध्ये खेळताना दिसतोय. गतमोसमात आय-लीग स्पर्धा थांबली तेव्हा चर्चिल ब्रदर्स संघ आठव्या क्रमांकावर होता.

चर्चिल ब्रदर्सचे १० मोसम
आय-लीग स्पर्धेत चर्चिल ब्रदर्स १० मोसम खेळला आहे. त्या खालोखाल गोमंतकीय संघात धेंपो स्पोर्टस क्लब, साळगावकर एफसी व स्पोर्टिंग क्लब द गोवा संघ प्रत्येकी ८ मोसम, तर वास्को स्पोर्टस क्लब एक मोसम खेळला आहे. आय-लीग स्पर्धेत सर्वाधिक प्रत्येकी १३ मोसम ईस्ट बंगाल व मोहन बागान संघ खेळले असून त्यांच्या नावे प्रत्येकी २७६ सामने आहेत. आगामी मोसमात ईस्ट बंगाल पारंपरिक प्रतिस्पर्धी मोहन बागानला मागे टाकेल.

आय-लीगमधील गोव्याचे विजेते संघ

  •   धेंपो क्लब (३ वेळा) : २००७-०८, २००९-१० व २०११-१२
  •   चर्चिल ब्रदर्स (२ वेळा) : २००८-०९ व २०१२-१३
  •   साळगावकर एफसी (१ वेळ) : २०१०-११

 

संबंधित बातम्या