‘आयएसएल’मध्येही बदली खेळाडू वाढले

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत कोविड-१९ मुळे बदली खेळाडूंची संख्या वाढली असून तीनऐवजी पाच राखीव फुटबॉलपटू सामन्यात खेळू शकतील. महामारीच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या आरोग्याचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे.

पणजी : आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत कोविड-१९ मुळे बदली खेळाडूंची संख्या वाढली असून तीनऐवजी पाच राखीव फुटबॉलपटू सामन्यात खेळू शकतील. महामारीच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या आरोग्याचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे.
प्रत्येक संघ सामन्यात कमाल तीन वेळा पाच बदली खेळाडू वापरू शकतील, यात पूर्वार्धानंतरच्या मध्यंतराचा समावेश नसेल, असे आयएसएलने स्पष्ट केले आहे.

कोविड-१९ मुळे खंडित झालेला फुटबॉल मोसम युरोपात सुरू झाल्यानंतर जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) बदली खेळाडूंची संख्या वाढविण्याचा नियम केला होता, त्याचा वापर आता आयएसएल स्पर्धेत प्रथमच होत आहे. आयएसएल स्पर्धेसाठी प्रत्येक संघात कमीतकमी पाच, तर सर्वाधिक सात परदेशी खेळाडू असू शकतील, त्यापैकी एक विदेशी आशियाई फुटबॉल महासंघाशी (एएफसी) संलग्न असावा लागेल. सामन्यात एका वेळेस पाच परदेशी फुटबॉल खेळू शकतील, तर संघात किमान सहा भारतीय असतील. सामन्याच्या दिवशी प्रत्येक संघात किमान दोन खेळाडू डेव्हलपमेंट चमूतील असतील, या गटातील खेळाडू १ जानेवारी २००० रोजी किंवा नंतर जन्मलेला खेळाडू असेल. 

कोरोना विषाणू महामारीमुळे आगामी सातवी आयएसएल स्पर्धा गोव्यातील तीन स्टेडियमवर जैवसुरक्षा वातावरणात बंद दरवाज्याआड खेळली जाणार आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, बांबोळी येथील जीएमसी अॅथलेटिक्स स्टेडियम व वास्को येथील टिळक मैदानावर मिळून स्पर्धेतील एकूण ११५ सामने होतील. पहिला सामना २० नोव्हेंबर रोजी बांबोळी येथे गतविजेता एटीके मोहन बागान व केरळा ब्लास्टर्स यांच्यात खेळला जाईल. स्पर्धेतील पहिल्या ११ फेऱ्यांचे वेळापत्रक सध्या जाहीर करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या