INDvsENG : एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला बसला मोठा फटका 

INDvsENG : एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला बसला मोठा फटका 
India and England

भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी व टी-ट्वेन्टी मालिकेनंतर आता तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. ही एकदिवसीय मालिका येत्या मंगळवारपासून खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्याआधी भारतीय संघाला फटका बसला असल्याची माहिती मिळाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात  खेळवण्यात आलेल्या पाचव्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला. आणि यासह मालिका 3 - 2 ने आपल्या खिशात घातली. परंतु या विजयावरचा रंग आयसीसीच्या कारवाईमुळे उतरला आहे. कारण आयसीसीने टीम इंडियावर मोठ्या प्रमाणात दंड ठोठावला आहे. आयसीसीने स्लो ओव्हर रेटमुळे संपूर्ण संघाला 40 टक्के मॅचचा दंड भरण्यास सांगितले आहे. (Before the ODI series against England Team India suffered a major blow)

भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध पाचव्या टी-ट्वेन्टी सामन्यात दुसर्‍या डावात निर्धारित वेळेनंतर दोन षटके फेकली. आणि त्याचा फटका भारतीय संघाला बसला असून, आयसीसीने हे पाऊल उचलत संघावर कारवाई केली आहे. आयसीसीने याबाबतचे एक निवेदन जारी करतानाच आचारसंहितेचे कलम 2.22 कमीतकमी ओव्हर वेगाच्या उल्लंघनाशी संबंधित कारवाई केली असल्याचे म्हटले आहे. आयसीसीच्या नियमानुसार, प्रत्येक धीम्या ओव्हरसाठी खेळाडूंना सामना शुल्काच्या 20 टक्के दंड आकारला जातो. आयसीसीकडून करण्यात आलेल्या कारवाई बाबत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपली चूक कबुल केली आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता सुनावणी होणार नाही. मैदानातील अंपायर अनिल चौधरी आणि नितीन मेनन तसेच तिसरे अंपायर के.एन. अनंतपद्मनाभम यांनी हे आरोप भारतीय संघावर ठेवले आहेत. 

दरम्यान, भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात खेळवण्यात आलेल्या पाचव्या टी-ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडच्या संघाचा 36 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 224 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. परंतु इंग्लंडचा संघ 188 धावाच करू शकला होता. टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 80 धावांची खेळी केली होती. तर हिटमॅन रोहित शर्माने देखील अर्धशतक झळकावले होते. शिवाय, भुवनेश्वर कुमारने धमाकेदार गोलंदाजी करत संघाच्या विजयाचा वाटा उचलला होता. भुवनेश्वर कुमारच्या उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. आणि विराट कोहलीला त्याच्या फलंदाजीसाठी प्लेअर ऑफ द सीरिज म्हणून निवडले गेले.  

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com