आयएसएल : ओडिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले

आयएसएल : ओडिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले
Copy of Gomantak Banner (22).jpg

पणजी : कर्णधार कोल अलेक्झांडर याने उत्तरार्धात नोंदविलेल्या शानदार गोलमुळे ओडिशा एफसीने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत हैदराबाद एफसीला पिछाडीवरून 1 - 1 गोलबरोबरीत रोखले.

सामना मंगळवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. सामन्याच्या 13व्या मिनिटास हालिचरण नरझारी याने हैदराबादला आघाडी मिळवून दिली, लिस्टन कुलासोच्या कल्पक असिस्टवर हा गोल झाला. नंतर 51 व्या मिनिटास दिएगो मॉरिसियोच्या असिस्टवर दक्षिण आफ्रिकन अलेक्झांडर याच्या गोलमुळे ओडिशा एफसीने बरोबरी साधली. सामन्याच्या अंतिम टप्प्यात ओडिशाने आघाडीसाठी जोरदार प्रयत्न केले, पण हैदराबादच्या बचावफळीत आकाश मिश्रा दक्ष ठरल्याने बरोबरीची कोंडी कायम राहिली. हैदराबाद आता सलग चार सामने अपराजित आहे.

बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणाचा लाभ झाला. हैदराबादची ही पाचवी बरोबरी ठरली. त्यांचे 12 लढतीनंतर 17 गुणांसह चौथा क्रमांक कायम राहिला. ओडिशाला चौथ्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यांचे 12 लढतीनंतर सात गुण झाले असून तळाचा अकरावा क्रमांक कायम राहिला. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात हैदराबादने ओडिशाला हरविले होते.

हैदराबादने आघाडी घेताना शानदार कल्पकता दाखविली. गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने दूरवरून मारलेल्या किकवर हैदराबादच्या आरिदाने सांताना याने हेडिंगद्वारे चेंडूला लिस्टन कुलासोच्या दिशा दाखविली. लिस्टनच्या वेगासमोर ओडिशाचे खेळाडू गडबडले. त्याचा लाभ उठवत गोमंतकीय आघाडीपटूने हालिचरण नरझारी याला गोल करण्याची सुरेख संधी प्राप्त करून दिली. 26 वर्षीय मध्यरक्षकाने गोलरक्षकाला चकवून चेंडूस नेटची दिशा दाखविताना अजिबात चूक केली नाही. विश्रांतीला सात मिनिटे बाकी असताना हालिचरण याला आणखी एक गोल करण्याची सुरेख संधी होती, पण गोलपोस्टच्या अडथळ्यामुळे यश मिळाले नाही.

विश्रांतीनंतरच्या सहाव्या मिनिटास दक्षिण आफ्रिकन कोल अलेक्झांडर याने ओडिशाला बरोबरी साधून दिली. दिएगो मॉरिसियो याच्या असिस्टवर अलेक्झांडर याने अप्रतिम मुसंडी मारत हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी सपशेल चकविले. ७४व्या मिनिटास ओडिशा संघ आघाडीच्या जवळ आला होता, परंतु आकाश मिश्रा याच्या दक्षतेमुळे गोल झाला नाही. ओडिशाच्या दिएगो मॉरिसियोने आशिष रायला गुंगारा दिल्यानंतर गोलरक्षक लक्ष्मीकांतही चकला होता, पण गोललाईनवरून आकाशने योग्यवेळी हेडिंग साधत प्रतिस्पर्ध्यांचा प्रयत्न फोल ठरविला.

दृष्टिक्षेपात...

- हालिचरण नरझारी याचे यंदाच्या मोसमात 4 गोल, एकंदरीत 71 आयएसएल सामन्यात 6 गोल

- कोल अलेक्झांडर याचे 11 आयएसएल लढतीत 2 गोल

- हैदराबाद 4 सामने अपराजित, 2 विजय, 2 बरोबरी

- हैदराबादचे यंदा 16, तर ओडिशाचे 12 गोल

- पहिल्या टप्प्यात बांबोळी येथील हैदराबादचा ओडिशावर 1 - 0 विजय

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com