टोकियो ऑलिंपिकचा आता एकूण अपेक्षित खर्च...११,३७,२०,६९,७५,३६१ रुपये

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 डिसेंबर 2020

टोकियो ऑलिंपिकचा खर्च सातत्याने वाढत आहे. एक वर्ष स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे खर्चात २२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता हा खर्च १५.४ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ११३७ अब्ज २० कोटी ७० लाख रुपये (११,३७,२०,६९,७५,३६१ रुपये) झाला आहे.

टोकियो- टोकियो ऑलिंपिकचा खर्च सातत्याने वाढत आहे. एक वर्ष स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे खर्चात २२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता हा खर्च १५.४ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ११३७ अब्ज २० कोटी ७० लाख रुपये (११,३७,२०,६९,७५,३६१ रुपये) झाला आहे.

ऑलिंपिक संयोजकांनी स्पर्धा खर्चाची माहीती दिली. गतवर्षीच्या अंदाजपत्रकात स्पर्धेचा खर्च १२ अब्ज ६० कोटी डॉलर म्हणजेच सुमारे ९३० अब्ज ४४ कोटी २१ लाख रुपये होता. हा अतीरिक्त २ अब्ज ८० कोटी डॉलर म्हणजेच २०६ अब्ज ७६ कोटी ४९ लाख रुपये खर्च स्पर्धा एक वर्ष लांबल्यामुळे वाढला आहे. २०१३ मध्ये टोकियोला ऑलिंपिक स्पर्धेचे संयोजन देण्यात आले. त्या वेळी हा खर्च ७ अब्ज ५० कोटी डॉलर म्हणजेच ५५३ अब्ज ८३ कोटी ४५ लाख रुपये असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

या स्पर्धेसाठीचा प्रामुख्याने खर्च जपान सरकार करणार आहे. एकंदरीत खर्चापैकी ६ अब्ज ७० कोटी डॉलर म्हणजेच सुमारे ४९४ अब्ज ७५ कोटी ७९ लाख रुपये खासगी खर्चातून उभारण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती तसेच टोकियो संयोजन समितीने सरकारकडून होणारा खर्च कमीत कमी असावा यासाठीच प्रयत्न करण्याची गरज आहे; अन्यथा भविष्यात स्पर्धा संयोजनाचा विचार करणारे देश खच्ची होतील, असा इशारा जर्मनीतील अभ्यासक फ्रान्झ वाल्डनबेर्गर यांनी दिला.

प्रत्यक्षातील खर्च 
१८४६ अब्ज ११ कोटी रुपये?
टोकियो ऑलिंपिकवरील खर्च १५.४ अब्ज डॉलर (११३७ अब्ज २० कोटी रुपये) सांगितला जात असला तरी प्रत्यक्षातील हा खर्च २५ अब्ज डॉलर (१८४६ अब्ज ११ कोटी रुपये) असल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे.

लक्षवेधक

  •  संयोजकांनी आदरातिथ्य सेवेत कपात करत असल्याचे ऑक्‍टोबरमध्ये सांगितले होते.

  • यामुळे २८ कोटी डॉलरनी खर्च कमी झाल्याचा दावा संयोजकांनी केला होता.

  • संयोजकांचा स्पर्धा कमी करण्यास तसेच क्रीडापटूंची संख्या कमी करण्यास विरोध.

  •  जनमत चाचणीत ६३ टक्के जपानवासीयांची स्पर्धा रद्द करण्यास अथवा लांबणीवर टाकण्यास पसंती.
  • स्थानिक पुरस्कर्त्यांच्या माध्यमातून सरकारी तिजोरीवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न.
  •  दीड कोटी डॉलरचे नवे पुरस्कर्ते निश्‍चित झाले असल्याचे संकेत.
  •  स्पर्धेसाठीच्या विमा रकमेतून ५० कोटी डॉलर मिळणार असल्याचे संकेत.

संबंधित बातम्या