`खेलो इंडिया`च्या तीन वर्षांत फक्त एकच सुवर्ण

`खेलो इंडिया`च्या तीन वर्षांत फक्त एकच सुवर्ण
xavier dsouza

पणजी

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे देशातील युवा क्रीडापटूंच्या उन्नतीचे ध्येय नजरेसमोर ठेवून घेण्यात येणाऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये गोव्याने तीन वर्षांत फक्त एकच सुवर्णपदक जिंकले आहे. हा आकडा निश्चितच निराशाजनक आहे.

स्पर्धेला २०१८ साली दिल्लीत सुरवात झाली. तेव्हापासून गोव्याने रौप्य आणि ब्राँझपदकेच अधिक प्रमाणात जिंकली आहेत. तीन वर्षांत गोव्याने एकूण ३६ पदके जिंकली, त्यात १६ रौप्य व १९ ब्राँझ मिळून ३५ पदके आहेत. या वर्षी जानेवारीत गुवाहाटी येथे झालेल्या तिसऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये गोव्याला १२ पदके मिळाली, त्यापूर्वी २०१९ मध्ये पुणे येथे १६ पदके जिंकली होती. स्पर्धेच्या पहिल्या वर्षी दिल्लीत गोव्याच्या खाती ८ पदकांची नोंद झाली होती.

 जलतरणात जास्त पदके

एकंदरीत गोव्याने या स्पर्धेच्या इतिहासात जलतरणात जास्त पदके जिंकली आहेत. गुवाहाटीत झालेल्या तिसऱ्या स्पर्धेत गोव्याला जलतरणात ८ पदके मिळाली. त्यात सुमन पाटील व श्रृंगी बांदेकर या महिला जलतरणपटूंनी प्रत्येकी तीन पदके पटकाविली. गोव्याचा राज्य खेळ फुटबॉलमध्ये २१ वर्षांखालील पुरुष गटात ब्राँझपदकाचेच समाधान मानावे लागले. एकही सुवर्णपदक न मिळाल्यामुळे या वर्षी १२ पदके जिंकूनही गोव्याला पदकतक्त्यात २९वा क्रमांक मिळाला.

एकमेव सुवर्ण झेवियरला

खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये गोव्याचे एकमात्र सुवर्णपदक जलतरणात नोंदीत झालेले आहे. २०१८ मध्ये जलतरणपटू झेवियर डिसोझा याने मुलांच्या १०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत प्रथम क्रमांक मिळविला होता. त्या वर्षी त्याने एका सुवर्णासह तीन रौप्य व एक ब्राँझ अशी एकूण पाच पदकांची कमाई केली होती.

 खेलो इंडिया स्पर्धेत गोवा

वर्ष स्थळ सुवर्ण रौप्य ब्राँझ एकूण

२०१८ दिल्ली १ ५ २ ८

२०१९ पुणे ० ८ ८ १६

२०२० गुवाहाटी ० ३ ९ १२

संपादन- अवित बगळे

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com