फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत प्रत्येक दिवशी ११,५०० प्रेक्षकांना संधी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

एकीकडे अमेरिकन ओपन अंतिम टप्प्यात आलेली असताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे पडघड वाजू लागले आहेत आणि तीन कोर्टवर मिळून प्रत्येक दिवशी ११,५०० प्रेक्षकांना स्टेडियममध्ये संधी देण्यात येणार आहे.

पॅरिस:  एकीकडे अमेरिकन ओपन अंतिम टप्प्यात आलेली असताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे पडघड वाजू लागले आहेत आणि तीन कोर्टवर मिळून प्रत्येक दिवशी ११,५०० प्रेक्षकांना स्टेडियममध्ये संधी देण्यात येणार आहे.

अमेरिकन ओपन स्पर्धेद्वारे ग्रॅंड स्लॅमचे लॉकडाऊन उघडले आणि लगेचच दुसऱ्या स्पर्धेत प्रेक्षकांनाही संधी मिळणार आहे. पॅरिसमध्ये कोरोनारुग्ण वाढत असले, तरी फ्रेंच ओपन संघटना प्रेक्षकांना संधी देण्यात सज्ज झाले आहेत. फ्रेंच ओपन स्पर्धा २७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

सरकारच्या नियमानुसार पॅरिससारख्या शहरात जास्तीत जास्त ५ हजार लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे; परंतु फ्रेंच टेनिस फेडरेशन वेगळी रचना करत आहे. ही संघटना स्टेडियम प्रेक्षकसंख्येच्या ५० ते ६० टक्के लोकांना प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

प्रेक्षकांना संधी देण्याचा प्रयत्न करत असताना सर्व नियमांची चौकटही आखण्यात येणार आहे. मास्क वापरणे सर्वांना बंधनकारक आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच प्रत्येकाला प्रवेश देण्यात येईल, असे सांगून स्पर्धा संचालक गाय फॉर्जेंट म्हणाले, पॅरिसमध्ये आल्यावर प्रत्येक खेळाडूचीही चाचणी करण्यात येईल. त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना खेळण्यास परवानगी देण्यात येईल; पण त्याअगोदर त्यांची अजून एक चाचणी करण्यात येईल. स्पर्धा सुरू झाल्यावर प्रत्येक पाचव्या दिवशी पुन्हा खेळाडूंची चाचणी करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या