गोवाः ''भारतीयांसाठी चांगल्या क्षणाची संधी हुकली''

दैनिक गोमंतक
मंगळवार, 27 एप्रिल 2021

आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी रात्री एफसी गोवा संघास ऐतिहासिक विजय अगदी थोडक्यात हुकला.

पणजी: आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी रात्री एफसी गोवा संघास ऐतिहासिक विजय अगदी थोडक्यात हुकला. सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना गोल स्वीकारल्यामुळे गोमंतकीय संघास कतारच्या अल रय्यान क्लबविरुद्ध 1-1 बरोबरीवर समाधान मानावे लागले. विजय गमावल्यामुळे भारतीयांसाठी चांगल्या क्षणाची संधी हुकल्याची सल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्पेनचे हुआन फेरांडो यांनी सामन्यानंतर व्यक्त केली. (Opportunity for a better moment missed for Indians')

IPL 2021: खेळाडू का जात आहेत आयपीएल सोडून?; जाणून घ्या कारण

``भारतातील सध्याची परिस्थिती खूप कठीण आहे, त्यामुळे सामना अतिशय महत्त्वाचा होता. आम्ही विचार करत होतो, की जिंकलो तर भारतीय लोकांसाठी तो चांगला क्षण असेल. सध्या खेळाडूंची स्थितीही खूप अवघड आहे. ते देशासाठी खेळण्याबाबत चर्चा करत होते. कठीण क्षणाची मला जाणीव आहे, पण आम्ही शेवटच्या क्षणास गोल स्वीकारला. हे फुटबॉल आहे,`` असे फेरांडो सामन्यानंतर म्हणाले. भारतातील सध्याच्या कोरोना विषाणू महामारी परिस्थितीसंदर्भात फेरांडो बोलत होते.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम झालेल्या ई गट सामन्यात, स्पॅनिश खेळाडू होर्गे ओर्तिझ याने तिसऱ्या मिनिटास केलेल्या गोलमुळे एफसी गोवास स्वप्नवत आघाडी मिळाली होती. 2019-20 मोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत लीग विनर्स शिल्ड पटकावलेल्या संघास आशियातील या प्रतिष्ठित स्पर्धेतील पहिला विजय खुणावत होता, पण बदली खेळाडू अली फेरीदून याने 89व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे अल रय्यान क्लबने बरोबरी साधली. 1998 मध्ये विश्वकरंडक जिंकलेल्या फ्रान्स संघातील सदस्य लॉरें ब्लांक यांच्या मार्गदर्शनाखालील अल रय्यान क्लब दहाव्यांदा एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळत असून हा संघ आठ वेळचा कतार लीग विजेता आहे. तुलनेत एफसी गोवा संघ प्रथमच एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळत आहे. त्यांनी पाचपैकी तीन सामने बरोबरीत राखले आहेत. अल रय्यानविरुद्ध जिंकले असते, तर एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत विजय मिळविणारा पहिला भारतीय क्लब हा मान एफसी गोवास मिळाला असता.

AFC Champions League: एफसी गोवाचा विक्रमी विजय हुकला

``सामन्याच्या शेवटच्या मिनिटास विजय गमावणे खूपच कठीण ठरते, पण आम्ही चांगल्या संघाविरुद्ध खेळत आहोत हे सत्य आहे. पर्सेपोलिस, अल वाहदा आणि अल रय्यान या संघाविरुद्ध खेळणे आनंददायी आहे,`` असे फेरांडो गटातील प्रतिस्पर्ध्यांविषयी म्हणाले. सध्या प्रत्येकी पाच सामने खेळल्यानंतर एफसी गोवाचे तीन, तर अल रय्यानचे दोन गुण आहेत. शेवटच्या फेरीत गुरुवारी (ता. 29) एफसी गोवा संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबविरुद्ध (10 गुण) खेळेल, तर अल रय्यानचा सामना इराणच्या पर्सेपोलिस एफसीविरुद्ध (12 गुण) होईल. ``खेळाडूंनी फार मोठी कामगिरी बजावली आहे, त्या कारणास्तव त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे. अर्थातच आम्हाला प्रगतीची आवश्यकता आहे. अल वाहदाविरुद्ध आमचा पुढील सामना आहे. काही जण दुखापतग्रस्त आहेत, त्यामुळे तयारी खडतर असेल,`` असेही फेरांडो यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या