स्पोर्टिंगने साधली उत्तरार्धात संधी; गोवा प्रोफेशनल लीगमध्ये चर्चिल ब्रदर्सवर दोन गोलने मात

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

सामन्याच्या पूर्वार्धात चर्चिल ब्रदर्सने वर्चस्व राखले, पण त्यांच्या खेळाडूंना लक्ष्य साधता आले नाही.

पणजी : गतवेळच्या संयुक्त विजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने उत्तरार्धात दोन वेळा संधी साधत गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत चर्चिल ब्रदर्सला 2-0 फरकाने हरविले. सामना बुधवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. स्पोर्टिंग क्लबने पूर्ण तीन गुणांची कमाई करताना सामन्याच्या शेवटच्या वीस मिनिटांच्या खेळात दोन्ही गोल केले. मोसमातील पहिलाच सामना खेळणारा नायजेरियन फिलिप ओदोग्वू याने सत्तराव्या मिनिटास गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडल्यानंतर 87व्या मिनिटास अॅलन फर्नांडिसने स्पोर्टिंगच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला.

सामन्याच्या पूर्वार्धात चर्चिल ब्रदर्सने वर्चस्व राखले, पण त्यांच्या खेळाडूंना लक्ष्य साधता आले नाही. सामन्याच्या विसाव्या मिनिटास चर्चिल ब्रदर्सच्या राकेश दास याचा ताकदवान फटका स्पोर्टिंगचा गोलरक्षक ओझेल सिल्वा याने रोखला. विश्रांतीनंतरच्या पहिल्याच मिनिटास चर्चिल ब्रदर्सला आणखी एक संधी होती, पण त्यांच्या जॉस्टन बार्बोझा याला फटका स्पोर्टिंगचा बचावपटू मायरन फर्नांडिसने रोखला. 

I League : चर्चिल ब्रदर्सची दुसऱ्या टप्प्यातील मोहीम शुक्रवारपासून

स्पोर्टिंगचा नायजेरियन आघाडीपटू फिलिप याने अगोदरच्या चुकीची भरपाई करताना सत्तराव्या मिनिटास गोल केला. यावेळी मायरन फर्नांडिसच्या लाँग पासवर मार्कुस मस्कारेन्हास याचा हेडर चर्चिल ब्रदर्सचा गोलरक्षक देबनाथ याने रोखला, पण तो चेंडू ताब्यात राखू शकला नाही. त्याचा लाभ उठवत फिलिप याने गोल केला. सामन्यातील तीन मिनिटे बाकी असताना स्पोर्टिंगच्या मार्कुस याने आणखी एक चढाई केली. यावेळीही त्याचा फटका चर्चिल ब्रदर्सच्या गोलरक्षकाने अडविला, पण रिबाऊंडवर अॅलेनला चेंडू लागून नेटमध्ये गेला.
 

संबंधित बातम्या