पाकिस्तानी खेळाडूंकडून महेंद्रसिंग धोनीला सलाम

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक बासीत अली, वासिम अक्रम, वकार युनुस, मुद्दसर नझर, शाहिद आफ्रिदी आणि त्यांच्यासह इतरही पाकिस्तानी खेळाडूंनी धोनीविषयी आदर व्यक्त केला आहे.

कराची: भारताचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असले पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचा गौरव केला आहे. भारताचा सर्वोत्तम कर्णधार आणि सर्वात मोठा प्रभावशाली खेळाडू अशा शब्दांत पाकच्या माजी खेळाडूंनी भावना व्यक्त केल्या आहेत.

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक बासीत अली, वासिम अक्रम, वकार युनुस, मुद्दसर नझर, शाहिद आफ्रिदी आणि त्यांच्यासह इतरही पाकिस्तानी खेळाडूंनी धोनीविषयी आदर व्यक्त केला आहे. पाकिस्तानकडून सर्वाधिक सामने खेळलेला इंझमाम म्हणतो, ‘माझ्या मते धोनी भारताचा सर्वोत्तम कर्णधार आहे, खराखुरा मॅचविनर होता, त्याच्याविरुद्ध खेळताना नेहमीच आनंद मिळायचा.’

धोनीचे कर्तृत्व भारतीय क्रिकेटमध्ये कायमस्वरूपी लक्षात ठेवले जाईल. आता धोनी निवृत्त झालेला असल्यामुळे विराट कोहलीला स्वतःचे महात्म्य निर्माण करण्याची संधी मिळणार आहे, असे पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक रशिद लतिफने म्हटले आहे. खेळाडू आणि कर्णधार म्हणून धोनी महान होता. सामना कोणत्या दिशेला चालला आहे हे अचूक ओळखण्याची त्याच्याकडे क्षमता होती आणि त्या दृष्टीने तो आपल्या चाली करायचा म्हणूनच तो सर्वोत्तम मॅचविनर होता, असेही लतिफने म्हटले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या